Siddheshwar Temple : सोलापुरात सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची जय्यत तयारी, सिद्धेश्वर मंदिराला आकर्षक सजावट!
Siddheshwar Maharaj Yatra, Solapur: सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला जवळपास 900 वर्षांची परंपरा आहे. यात्रेला केवळ सोलापूरच नाही महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक (Karnataka), आंध्र इत्यादी राज्यातून देखील भाविक घेत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात्रेतील प्रमुख विधी असलेल्या अक्षता सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतात. मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे हा अभूतपूर्व सोहळा अनेक भाविकांना याची देही याची डोळा पाहता आला नाही.
कोरोनाचे सावट कमी झाल्याने आणि राज्य शासनाने निर्बंध कमी केल्याने यंदा सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यात्रेतील धार्मिक विधींना उद्यापासून सुरुवात होणार असून मुख्य धार्मिक विधी एक दिवस उशिरा होणार आहेत, अशी माहिती यात्रेची प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी दिली.
दरवर्षी प्रथेप्रमाणे मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा पार पडत असतो. दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत असते. त्यामुळे 13 जानेवारीला सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा पार पडत असतो.
यंदाच्या वर्षी अधिक महिना आल्यानं मकर संक्रांत ही एक दिवस उशिरा अर्थात 15 जानेवारी रोजी साजरी होणार आहे.
त्यामुळे सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा हा 13 जानेवारी ऐवजी 14 जानेवारी रोजी साजरा होणार आहे. त्यापूर्वी यात्रेतील आणखी एक प्रमुख विधी असलेला यन्नीमज्जन सोहळा 13 जानेवारी रोजी पार पडणार आहे. यात्रेतील धार्मिक विधी मात्र उद्या 11 जानेवारी पासून सुरु होणार आहेत.
900 वर्षांपासून ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेच्या धार्मिक कार्यास रुढी परंपरेप्रमाणे 11 जानेवारी पासून सुरुवात होते. सिध्दरामेश्वरांच्या हातातील योगदंड उत्तर कसबा येथील कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून मठपती (स्वामी) हा योगदंड शुक्रवार पेठ येथील कै. रामचंद्रप्पा शेठे यांच्या वाड्यात घेऊन जातात. त्याठिकाणी मानकरी हिरेहब्बू आल्यानंतर त्या योगदंडाची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर होमहवन आणि अॅड. मिलिंद थोबडे हे पादपूजा करतात. त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम होतो.
कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजास साज चढविण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होते.
सकाळी 8 वाजता कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होते. पुजा झाल्यानंतर यात्रेस प्रारंभ होतो. त्यानंतर श्री सिध्देश्वर प्रशालेसमोर कलेक्टर कचेरीच्या जुन्या फाटकाजवळ 1 ते 7 काठ्या येऊन उभारल्यानंतर सरकारतर्फे देशमुख हे हिरेहब्बू यांना सरकारी आहेर करतात. हा मान ब्रिटीश काळापासून आजतागायत चालू आहे.
तिथून हे नंदीध्वज सिध्देश्वर मंदिरात 68 लिंगापैकी पहिले लिंग अमृत लिंगाजवळ येऊन थांबतात. त्याठिकाणी सातही नंदीध्वज आल्यानंतर हिरेहब्बू आणि शेटे तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधीवत पूजा करतात.
ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेची सांगता कप्पडकळी विधिने होते.
पाचही नंदीध्वजाची हिरेहब्बूंच्या हस्ते पुजा झाल्यावर कप्पकळीचा कार्यक्रम होतो. सर्व भाविकांना त्याठिकाणी हिरेहब्बूच्या हस्ते खारीकाचा प्रसाद देऊन पाच दिवसांच्या यात्रेचा कार्यक्रमाची सांगता केली जाते