Sindhudurg News: कोकणात अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला; पीपीई कीट घालून अंत्यसंस्कार, पाहा फोटो!
Sindhudurg Latest News Updates: सिंधुदुर्ग : स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील तिथवली गावात घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअखेर दोन तासानंतर पीपीई किट घालून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनं वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
तिथवली महंमदवाडी येथील शेतकरी पांडुरंग कृष्णा हरयाण वय 70 यांच वृद्धापकाळानं बुधवारी रात्री निधन झाले. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता नागरिकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरातून बाहेर काढला. यावेळी जवळपास 60 ते 70 ग्रामस्थ उपस्थित होते.
विधी सुरू असल्यामुळे मृतदेह स्मशानभूमीच्या बाजूला ठेवण्यात आला होता. स्मशानभूमीत काही ग्रामस्थ सुकलेली लाकडं जाळून धूर करत होते.
स्मशानभूमीच्या बाजूला अडगळीत ऐनाच्या झाडावर काळंबा मधमाशांचं पोळं होतं. धुराचा लोळ त्या मधमाशांच्या पोळाकडे जाताच मधमाशा आक्रमक झाल्या.
उठलेल्या माशांनी स्मशानभूमीत असलेल्या ग्रामस्थांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात ग्रामस्थ मिळेल त्या वाटेनं सैरावैरा पळत सुटले.
अनेक जणांना मधमाशांनी जखमी केलं. मृतदेहावर देखील मधमाशा बराच वेळ घोंघावत होत्या.
मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे? असा यक्षप्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला.
मधमाशा ग्रामस्थांची जवळपास एक किमी अंतरापर्यंत पाठलाग करत होत्या. अडीच तासानंतर उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून पाच पीपीई किट घटनास्थळी नेण्यात आले.
मयत पांडुरंग हरयाण यांच्या मुलानं पीपीई किट घालून विधी पूर्ण केले. इतर चार ते पाच जणांनी पिपीई कीट घालून स्मशानभूमीत जात त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. तर एक जण हेल्मेट घालून स्मशानभूमीत उपस्थित होता.