पुण्यात 69 व्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवास सुरुवात
परंपरेनुसार तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी राग मधुवंतीने सुरवात केली आणि 'वैष्णव जन तो' या भजनाच्या वादनाने त्यांनी सांगता केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिराणा घराण्याचे गायक संजय गरूड यांनी गायनाची सुरुवात राग भीमपलास मधील 'अब तो बडी देर' या रचनेतून केली. त्याला जोडून द्रुत त्रितालात 'बीरज मे धूम मचाए शाम' ही प्रसिद्ध बंदिश त्यांनी रंगवली. 'माझे माहेर पंढरी' या प्रसिद्ध अभंगाने त्यांनी भक्तिरसपूर्ण भाव निर्माण केले.
'सवाई' च्या स्वरमंचावर सुविख्यात गायक पं. कुमार गंधर्व यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारशाचे दर्शन घडवले.
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव मागील 69 वर्षांपासून आयोजित करण्यात येतो.
अनेक वर्ष दिग्गज कलाकारांनी हा मंच गाजवला आहे. यावर्षी 13 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान हा दैदीप्यमान सोहळा संपन्न होणार आहे. मुकुंदनगरमधील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुलात हा महोत्सव होत आहे.