Sangli : इस्लामपूरच्या RITविद्यार्थ्यांची कमाल; रोलिंग सपोर्टरची निर्मिती करत बैलपोळ्याची दिली अनोखी भेट
पश्चिम महाराष्ट्रात आज बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. बैलांच्या प्रति आदर व्यक्त करणारा दिवस आणि सण म्हणून बेंदूर सणाची खास ओळख आहे. पण इस्लामपूरमधील आरआयटीमधील काही विद्यार्थ्यांनी अनोख्या पध्दतीने बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या मानेवरील ओझे कमी करण्याचा एक प्रयोग केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया विद्यार्थ्यांनी बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट बनवत बैलांच्या मानेवरील ओझे कमी करणारी किमया साधली आहे. या संशोधक विद्यार्थ्यांनी 'सारथी' या नावाने हा प्रकल्प पूर्ण केला आहे. संशोधन निधी अंतर्गत या प्रकल्पासाठी 10 हजार रुपये निधी मिळाला असून या रोलिंग सपोर्ट प्रकल्पाचे पेटंट मिळविण्यासाठी अर्ज देखील केला गेला आहे.
भारतासारख्या कृषिप्रधान देशात बैलांना आणि त्यांच्या कष्टांना मोठा सन्मान मिळतो. बेंदूर सण तर बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच साजरा केला जातो. बारा महिने शेतीमध्ये राबणाऱ्या आणि ऊस वाहतूक करताना प्रचंड ओझे सहन करावे लागणाऱ्या बैलांच्या मानेवरील हेच ओझे काहीसे कमी करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून केला आहे.
इस्लामपूरमधील आरटीआय महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल अभियांत्रिकी विभागाच्या शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड आणि ओमकार मिरजकर या विद्यार्थ्यांना खास बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट बनविण्याची कल्पना सुचली. ही कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेत अवघ्या काही दिवसांत बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट बनवत बैलांच्या मानेवरील ओझे कमी करणारी किमया साधली आहे.
महाराष्ट्रात साखर कारखानदारीचे मोठे जाळे आहे. ऊस वाहतूक करताना मोठ्या प्रमाणावर आजही बैलगाडीचा वापर केला जातो. बैलगाडी मालकाकडून बैलगाडीत कित्येक टन ऊस भरला जातो. ऊसाने भरलेली बैलगाडी ओढताना बैलांच्या तोंडाला अक्षरशः फेस येतो, बैलांना प्रचंड दम लागतो. यामध्ये काही वेळा बैलांचा पाय घसरणे, बैलाचा पाय मोडणे अशा घटना घडून बैल मोठ्या प्रमाणावर जखमी देखील होत असतात.
या सगळ्या बैलांना होणाऱ्या त्रासातून त्यांची काही प्रमाणात तरी सुटका व्हावी या भावनेतून या विद्यार्थ्यांनी अफलातून संकल्पना साकारत कामाला सुरुवात केली.
बैलगाडीमध्ये दोन बैलांमध्ये तिसरे चाक सुरुवातीला बसविले. यामुळे बैलांवरचा भार कमी होतो आणि बैलगाडीसाठी पूर्ण संतुलन देते. हा रोलिंग सपोर्ट बैलांच्या उंचीनुसार देखील कमी-जास्त आणि वर खाली करू शकतो.
याचा उपयोग ऊस भरताना खाली आणि शेतातून वाहतूक करताना होतो. त्यातून बैलांवरील ओझे कमी करण्यात यश आले आहे. या प्रकल्पाची चाचणी ऊस भरताना आणि रस्त्यावरून वाहतूक करताना केली आहे. येणाऱ्या गळीत हंगामात प्रयोगाची प्राथमिक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.