Pune News : शुभमंगल सावधान! श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा पारंपरीक पद्धतीने थाटात साजरा
शुभमंगल सावधानचे स्वर कानी पडताच वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणाऱ्या पारंपरिक वेशातील महिला... राधे कृष्ण, गोपाल कृष्णचा वऱ्हाडी मंडळींनी केलेला अखंड जयघोष आणि डोक्यावर कृष्णाची मूर्ती व तुळशी वृदांवन घेऊन काढलेली वरात… अशा थाटात पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह सोहळा मंडईतील साखरे महाराज मठात पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मठापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, ज्ञानेश्वर रासने, संतोष रसाळ, गजानन धावडे, बाळासाहेब सातपुते तसेच सुलोचना रासने, संगीता रासने, मृणाली रासने, राजश्री गोडसे, माई चव्हाण, लोंढे ताई यांसह महिलावर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
एरवी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी आज चक्क श्रीकृष्ण-तुलसी विवाह सोहळ्यानंतर परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होत, उत्तम आरोग्य व सुखी समाज याकरीता प्रार्थना केली. तब्बल 40 वर्षांहून अधिक काळ ही परंपरा सुरू आहे.
विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित मिरवणुकीचे चौका-चौकात उत्साहात स्वागत करत श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत फुगड्या घालत फेर धरुन महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
दरबार ब्रास बँडदेखील सहभागी झाले होते. रांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता.
दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीचा समारोप समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात झाला. त्यानंतर आयोजित विवाहसोहळ्याला पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली