सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी, सुरेश धस यांना पाहताच भोसले कुटुंबीयांनी आक्रोश केल्याचे दिसून आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसतिश भोसले याच्याकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच, वन विभागाने देखील कारवाई केली होती.
वन विभागाच्या कारवाईत खोक्याचे घर जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. मात्र, कोणत्या कायद्यान्वये खोक्याचे घर पाडले असा सवाल आमदार धस यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर, ते आज खोक्याच्या घरी भेट देण्यासाठी गेले होते.
शिरूर कासार तालुक्यात वृक्ष लागवड शून्य टक्क्यावर आल्याने हे लपवण्यासाठी वन विभागाकडून असे कृत्य करण्यात आल्याचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले. आमदार धस यांनी आज सतिश उर्फ खोक्याच्या पाडलेल्या घरी भेट दिली.
मी वनविभाग कायद्यानुसार हे कोणत्या कायद्यानुसार केले याची माहिती घेणार आहे, हे घर साठ वर्षांपूर्वीच आहे. हे कोणत्या नियमात बसते, असा सवालही आमदार धस यांनी उपस्थित केला आहे.
सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्ती मारहाणीवरून तक्रार दाखल केली होती, पण याचे घर पाडण्याचे कारण काय? कुणाच्या दबावाखाली केले हेच आम्ही बघत आहोत, असेही धस यांनी म्हटले.
जिल्ह्यातील जुने व्हिडिओ काढायचे आणि कोणाच्याही बदनाम्या करायचा असा प्रकार सुरू आहे, देशमुख प्रकरण वळवण्यासाठी ही सुरू असल्याचेही आमदार धस यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, यावेळी सतिश भोसलेची पत्नी व आई यांच्यासोबत संवाद साधत आमदार सुरेश धस यांनी त्यांची कैफीयत ऐकून घेतली. तसेच, वन विभागाला इशाराही दिला आहे.