Vidhan Sabha Election : माजी खासदारांना आमदारकीचे वेध, सेना भाजप अन् काँग्रेस नेते विधानसभेच्या रिंगणात, जनतेचा कौल घेणार
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. लोकसभा निवडणुकीत संधी न मिळालेले किंवा पराभव स्वीकारावा लागल्यानं संसदीय राजकारणाच्या बाहेर असलेले नेते पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळतो यासाठी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मुंबई उत्तर मधून काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झालेले संजय निरुपम सध्या शिवसेनेत आहेत. ते दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती आहे. तिथं सध्या ठाकरे गटाचे सुनील प्रभू आमदार असून तेच पुन्हा रिंगणात असतील. एकनाथ शिंदेंनी निरुपम यांना संधी दिल्यास संजय निरुपम विरुद्ध सुनील प्रभू असा सामना पाहायला मिळेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल शेवाळे यांना लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल देसाईंनी राहुल शेवाळे यांना पराभूत केलं होतं. आता राहुल शेवाळे चेंबुर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. तिथं सध्या ठाकरेंच्या सेनेचे प्रकाश फातर्फेकर आमदार आहेत. या ठिकाणी देखील दोन्ही सेनेत सामना होऊ शकतो. चेंबुरमधून अनिल देसाईंना आघाडी मिळाली होती.
बोरिवली विधानसभा मतदारसंघासाठी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचं नाव चर्चेत आहे. विद्यमान आमदार सुनिल राणे यांच्याऐवजी गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी मिळावी म्हणून मुंबई भाजपचा एक नेता आग्रही असल्याची माहिती आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी यांना पक्षानं संधी न देता पियूष गोयल यांना लोकसभेला उमेदवारी दिली होती. गोपाळ शेट्टी मुंबई उत्तरचे खासदार होते.
मनोज कोटक हे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्याऐवजी मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, मिहीर कोटेचा यांचा ठाकरेंच्या सेनेच्या संजय दिना पाटील यांनी पराभूत केलं होतं. मिहीर कोटेचा यांच्या मुलूंड विधानसभा मतदारसंघातून मनोज कोटक विधानसभा लढवू शकतात अशा चर्चा आहेत.
काँग्रेस नेत्या प्रिया दत्त या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाच्या खासदार होत्या. या मतदारसंघात आता वर्षा गायकवाड खासदार आहेत. काँग्रेसकडून त्यांना वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली जाऊ शकते. त्या पुन्हा एकदा पक्षामध्ये सक्रिय झाल्या आहेत. वांद्रे पश्चिमला भाजपचे आशिष शेलार आमदार आहेत.