कर्नाक उड्डाणपूल पाडकाम पूर्ण, हार्बर लाईनवरील लोकल सेवा रात्री 8 वाजता होणार सुरु
मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. कर्नाक पुलाचं पाडकाम पूर्ण झालं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुपारी चार वाजता पुलाच्या कामानंतर सीएसएमटी ते ठाणे लोकल धावायला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी कर्नाक आणि कोपरी पूल हटवण्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता.
यातच आता कर्नाक पुलाचं काम पूर्ण झालं आहे. मात्र हार्बर लाईनवरील काम सुरु असून रात्री 8 नंतर लोकल सेवा सुरु होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाक पुलाचं पाडकाम शनिवारी रात्री 11 पासून सुरु झालं होत. 1868 मध्ये बनवण्यात आलेला हा पूल आता पाडण्यात आला आहे.
याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी माहिती देताना सांगितले की, अतिशय काटेकोरपणे नियोजनबद्ध पद्धतीने 27 तासांच्या मेगाब्लॉकमध्ये 17 तासातच मेन लाईनची लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच हार्बर लाईनची लोकल सेवा ठरलेल्या वेळेनुसार म्हणजेच रात्री 8 वाजता सुरु केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
यातच आता जलद आणि धीम्या या दोन्ही मार्गाची वाहातून पूर्णपणे सुरु झालेली आहे. तर हार्बर लाईनवर अद्यापही काम सुरु आहे.
तसेच मध्य रेल्वेवरील यार्ड लाईन ज्यावरून एक्सप्रेस रेल्वे धावतात, त्याचं काम अद्यापही सुरु आहे. मात्र हे कामही लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम करण्यासाठी तब्बल 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.
यासाठी मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. ठाण्याकडून मुंबईकडे आणि मुंबईकडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना कोपरी ब्रिजजवळ दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.
या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कोपरी ब्रिजच्या रुंदीकरणासाठी एकूण सात गर्डर टाकण्यात येणार आहे.