PHOTO : 'सांगा कसं जगायचं', शिमला मिर्चीला कवडीमोल भाव! शेतकरीपुत्राची आर्त हाक, तरीही लढण्याचा जज्बा कायम
गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे केवळ टोमॅटोच्याच बाबतीत नाही तर अन्य पिकांच्या बाबतीत देखील घडतंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील शेतकरी अमर चव्हाण यांनी कर्ज काढून शिमला मिर्चीचं उत्पादन घेतलं. मात्र भाव नसल्याने मोठ्या प्रमाणावर माल फेकून द्यावा लागत आहेत. अमर चव्हाण यांनी फेसबुकवर पोस्ट करत सांगा कसं जगायचं म्हणत प्रशासनाला सवाल केला आहे.
पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, दरवर्षी प्रमाणे यंदाही शिमला लागवड केली असून यावर्षी मार्केट रेट गेल्यावर्षीच्या तुलनेत 10 पटीने कमी आहेत. लाखोंची देणी उपसून पिकांवर खर्च केलेत. आज तोडणीस सुरुवात केलीय दोन एकरावर निम्म्यात माल 5 टन निघालाय.पैकी बाजार नसल्याने थोडस दुर्लक्ष केल्याने 30 टक्के माल पिकून जमीनवर टाकून द्यावा लागतो आहे
चव्हाण म्हणतात, मनस्थितीच नाही आज ही माल तोडायची,पण काय करणार उभं भरलेलं पीक लकलक करतंय, मालाची आलेली उतरंड पाहून काळजात कालवा कालव होते आहे, किमान यावर्षी झालेला खर्च तरी निघावा अशी नाममात्र आशा होती पण ती पण मावळली आहे,रोजगऱ्यांचे पगार देणं मुश्किल झालंय,मनात काहूर माजलंय,त्यातच गेल्यावर्षी व्यापाऱ्यांनी लाखोला टोपी घातली असताना देखील,सावरून ,व्याजाने,हातउसने काढून पीक भरात आणलं आहे,पण दर मिळतोय 4 रुपये किलो,त्यातच मजुरी,त्यातच पॅकिंग,त्यातच वाहतूक,कस सावराव हेच कळेना झालंय... आता किमान पुढील दोन वर्षे सावरता येईल असं वाटत नाही.
त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, औषधांच्या उधारींनी लाखभराचा टप्पा ओलांडला आहे,दुकानदारांची देणी द्यायला पुन्हा नवीन पर्याय शोधत फिरावे लागणार अस दिसतंय, हे उभं पीक नांगरून दुसरं कांही कराव,अस कोणत्याच पिकाला भविष्य दिसत नाही,गेल्या वर्षभरात घरात सगळ्यांना दाखवलेल्या स्वप्नांवर पाणी ओतावे लागणार आहे, लेकराबळांना चांगल्या शाळेत पाठवायचा केलेला निश्चय पुन्हा गुंडाळायला लागणार दिसतंय, सरकारी दरबारी फक्त आरोपांच्या फैरी शिवाय कांही दिसत नाही,सरकार कोणाचेही असो आपल्याला शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही,सब घोडे बारा टक्के या उक्तीप्रमाणे ज्याला त्याला स्वतःच्या अस्तित्वाची लढाई प्रिय झालीय,बळीराजाला कोणी वाली दिसून येत नाही,या वर्षी पुन्हा रंगवलेली स्वप्ने डोळ्यादेखत मातीत मिसळताना पाहून आश्रू गाळण्याशिवाय पर्याय दिसत नाही, आज जरी पूर्णपणे मोडलो असलो तरी मी लढणार आहे...मला कसल्याही सहानुभूतीची आवश्यकता नाही...मी लढणार आहे...