Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीडमध्ये मराठ्यांची त्सुनामी, रॅलीली किती गर्दी?; मनोज जरांगे म्हणाले, मी नतमस्तक
मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला बीडमध्ये मोठी गर्दी झाली असून आत्तापर्यंतची एखाद्या रॅलीसाठी झालेली ही सर्वात मोठी रेकॉर्डब्रेक गर्दी असल्याचं बोललं जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांच्या रॅलीत सहभागी झाले असून तुफान गर्दीमुळे शहरातील सर्व रस्ते जाम झाले आहेत.आत्तापर्यंतच्या पाचही जिल्ह्यातील गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणारी ही गर्दी असल्याचे सांगितले जात आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व बाजूने भगवे झेंडे,बॅनर लागलेले आहेत. तसेच छोटे-मोठे मंडप घालण्यात आले असून तिथे पिण्याचे पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आल्याचं दिसून आलं. स्वयंसेवक बनून मराठा बांधव या रॅलीसाठी मदत करत आहेत.
मनोज जरांगे यांनी बीडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर, त्यांची रॅली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजा चौकाकडे वळाली आहे.
उपोषणकर्ते आणि शांतता रॅलीचे प्रमुख मनोज जरांगे यांनीही बीडमधील गर्दीवर भाष्य करताना बीडच्या जनतेचे आभार मानले आहेत. शांतता रॅलीला प्रत्येक जिल्ह्यात गर्दी झाली, मराठ्यांनी मराठ्यांच्या गर्दीचे रेकॉर्ड तोडले, असे जरांगे यांनी म्हटले.
मनोज जरांगे यांचाही बीडमधील गर्दी पाहून उत्साह वाढल्याचं दिसून आलं. मराठा समाजाचे आभार मानताना जरांगे यांनी सरकारला इशाराही दिला आहे. तसेच, मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही, असेही जरांगे यांनी म्हटले.
बीड जिल्ह्यातील मराठा समाजापुढे मी नतमस्तक होतो, मराठा समाजाचे मनापासून आभार मानतो, असे म्हणत बीडमधील शांतता रॅलीसाठी झालेल्या गर्दीवरुन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला धन्यवाद दिले आहेत.
माझ्या मराठ्यांनी कधीच जातीवाद केला नाही, पण बीडच्या मराठ्यांना जातीवादाचा डाग लावला. माझ्या बीडच्या बहाद्दरांवर खोट्या केसेसही केल्या. पण, आज मला मराठ्यांचा गर्व वाटत आहे, या जातीत जन्म घेतल्याचा मला गर्व आहे. या जातीत जन्म घेतला ही चूक झाली असं बोललं जायचं. पण, या जातीत जन्म घेतल्याचा गर्व आहे, असे जरांगे यांनी म्हटले.
बीड शहरातील शांतता रॅलीसाठी 80 भोंगे बसवण्यात आले असून 800 स्वयंसेवक सज्ज आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी 12 रुग्णवाहिका असून त्यातील 4 कार्डियाक रुग्णवाहिका आहेत. घरासाठी 3500 पुरुष स्वयंसेवक व 1500 महिला स्वयंसेवक सज्ज असून 15 डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, बीडमधील मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बीड शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. शहरातील विविध मार्गावरील रस्ते जाम झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती.