In Pics : राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन; कुठे काय सुरु, काय बंद?
राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. त्यामुळे अनेक जिल्हांमध्ये प्रशासनाने लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू केले आहेत. या दरम्यान प्रशानसनाने अनेक निर्बंध लादले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक शहरासह जिल्ह्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 12 मे ते 22 मे दरम्यान हा लॉकडाऊन असणार आहे. किराणा दुकान, भाजी बाजार बंद राहणार, केवळ होम डिलिव्हरी मिळणार. तसेच पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहनांना पेट्रोल नाही.
अकोला जिल्ह्यात आज (10 मे) मध्यरात्रीपासून सहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनला सुरूवात झाली. या लॉकडाऊनला अकोला शहरासह जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळतोय. 15 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. लॉकडाऊनमधून सरकारी आणि खाजगी दवाखाने, मेडिकल स्टोअर्स आणि इतर वैद्यकीय सेवांना सूट देण्यात आली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना फक्त घरपोच पार्सल सुविधेची परवानगी देण्यात आलीये. तर दुध विक्रीला सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन तास परवानगी देण्यात आलीये. वैद्यकीय कारणांशिवाय कुणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात शनिवार 8 मे रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व सुविधा 15 मे पर्यंत बंद असणार आहेत.
कल्याणनजीकच्या बदलापूर शहरात 8 मे पासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये बदलापूरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकानं आठ दिवसांसाठी काटेकोरपणे बंद राहतील. दूध, फळे भाजीपाला, किराणा या दुकानदारांना फक्त होम डिलिव्हरी देता येईल. अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कडक स्वरूपाची कारवाई केली जाईल. तर मेडिकल आणि दवाखाने मात्र सुरू राहतील.
बुलडाणा जिल्ह्यात 10 मे रोजी रात्री 8 वाजेपासून ते 20 मे च्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत असा दहा दिवसाचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान केवळ मेडिकल सेवा वगळता इतर आस्थापने पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्याअंतर्गत एसटी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय इतर धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यात रविवारी (9 मे) दुपारी 12 वाजेपासून 15 मे रोजी रात्री 12 पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी आहे. या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्गात 9 मे रात्री 12 वाजल्यापासून 15 मे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत किराणा, बेकरी, भाजीपाला, दूध व्यावसायिकांना होम डिलिव्हरी करायची मुभा देण्यात आली आहे. कृषि अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकानांची सेवा सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीतच सेवा देण्यास परवानगी राहील. हॉटेल, रेस्टॉरंट यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते दुपारी 2 व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहील. जिल्ह्यातील रास्त भाव दुकाने सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी राहील. शिवभोजन केंद्र सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल.
बीडमध्ये 5 मे ते 7 मे पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. यात अनेक अत्यावश्यक सेवांवरही बंधने घालण्यात आली होती. मात्र हे कडक लॉकडाऊन आता 12 मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत.