तांदळाच्या दाण्यावर रेखाटली विठ्ठल प्रतिमा, चित्रकार समीर चांदरकर यांची अप्रतिम कलाकृती
आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठल भक्तांसाठी भक्तीचा सणच असतो. लाखो भक्तगण आपली भक्ती विविध माध्यमातून पांडुरंगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकांना तर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीमध्ये विठ्ठलाचेच रूप दिसत असते. अशाच एक अवलियाला तांदळाच्या दाण्यावर विठ्ठल दिसला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूलचे कलाशिक्षक चित्रकार समीर चांदरकर यांनी आपल्या चित्रकलेतून चक्क छोट्याश्या तांदळाच्या दाण्यावरच पोस्टर कलरचा वापर करून विठ्ठलाची सुबक प्रतिमा रेखाटली.
एवढ्या छोट्या आकारातील चित्र साकरण्याचा हा चांदरकर यांचा पहिलाच प्रयत्न आहे. ज्या तांदळाच्या दाण्यावर सरांनी विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. त्या तांदळाच्या दाण्याचा आकार आहे. 2mm x 7 mm आणि विशेष म्हणजे हे चित्र रेखाटण्यासाठी त्यांना अवघ्या 15 मिनिटांचा वेळ लागला. दाण्यावर साकारलेली कलाकृती पाहण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा वापर करावा लागतो. प्रत्यक्ष पेंटिंग करताना सुद्धा त्यांना बहिर्वक्र भिंगाचा वापर करावा लागला.
तांदळाच्या दाण्याचा आकार लहान असल्याने पेन्सिल ड्रॉईंग करणं अशक्य होतं. त्यामुळेच थेट रंगकामातूनच विठ्ठलाचे रूप साकारले. अपेक्षित परिणामांसाठी '0' क्रमांकाच्या ब्रशचेही काही केस कापून ब्रश अधिक सूक्ष्म करून सूक्ष्म तांदळावर समिर चांदरकर यांनी विठ्ठलाचे अप्रतिम चित्र रेखाटले आहे.
तांदळाच्या दाण्यावर चित्र रेखाटून चांदरकर सरांना एक महत्त्वाचा संदेश सर्व विठ्ठल भक्तांपर्यंत पोहोचवायचा आहे. तो म्हणजे, हिरण्यकश्यपू ने भक्त प्रल्हादाला विचारले देव कुठे आहे? तेव्हा भक्त प्रल्हादाने सांगितले, कि या चराचरामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये देवत्व सामावलेलं आहे. परंतु आज आपल्या हव्यासापोटी आपण निसर्गाचा समतोल बिघडवत आहोत, एखाद्या समारंभात कितीतरी अन्न आपण वाया घालवतो. अन्नाचा प्रत्येक कण महत्त्वाचा आहे. कांदा, मुळा, भाजी, अवघी 'विठाई' माझी...' अशाप्रकारे एका आगळ्या वेगळ्या पध्दतीने चित्रकार समीर चांदरकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.