Ajit Pawar Meets Sharad Pawar: चार दिवसांत तीनदा भेट... थोरल्या पवारांकडून नेमकं काय हवंय अजित पवारांना?

Maharashtra NCP Crisis: अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलली. बंडानंतर अजित पवारांनी थोरल्या पवारांवर टीकेची झोड उठवली होती. पण आता पुन्हा वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

Maharashtra NCP Crisis | Ajit Pawar vs Sharad Pawar

1/10
अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांकडून सातत्यानं थोरल्या पवारांची मनधरणी केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मनोमिलन होणार की, पुन्हा एकदा राजकीय घडामोडी वेगळं वळण घेणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
2/10
अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी सोमवारी (17 जुलै) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
3/10
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या समर्थक आमदारांनी सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक झाली. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर अजित पवार यांची शरद पवारांशी झालेली ही तिसरी भेट होती.
4/10
या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत आलो होतो. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंध राहावा, अशी विनंती आम्ही त्यांना केली. त्यांनी आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं, पण यावर काहीही बोलले नाहीत. मंगळवारी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत मी आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याचंही यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
5/10
सूत्रांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांमध्ये काल शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमुळे अस्वस्थता निर्माण झाली होती. काल विधानभवनात झालेल्या बैठकीत आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही केवळ मंत्र्यांना घेऊन थोरल्या पवारांच्या भेटीसाठी का गेलात? अशी विचारणा अजित पवारांना आमदारांनी केली.
6/10
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी आपली नाराजी व्यक्त केली. शरद पवारांसोबतच्या भेटीमुळे केवळ मंत्र्यांनाच सहानुभूती मिळेल, असंही आमदार म्हणाले. मात्र आमदारांना आपापल्या मतदारसंघात मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असं आमदारांचं म्हणणं होतं. त्यामुळेच काल (सोमवारी) अजित पवार आणि त्यांच्या 15 समर्थक आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली.
7/10
याआधी रविवारी (16 जुलै) अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवार यांची मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्याशिवाय हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, आदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली.
8/10
या भेटीबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, शरद पवार हे वर्षानुवर्षे त्यांचे नेते होते, त्यामुळेच ते त्यांना भेटायला गेले असावेत, त्यात काही मोठं नाही. दुसरीकडे भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, अजित पवार गट अजूनही शरद पवारांनाच आपला नेता मानतो. ज्येष्ठ नेत्याला भेटण्यात गैर काहीच नाही.
9/10
प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी सांगितलं की, आम्ही शरद पवारांना राष्ट्रवादीला एकसंध ठेवण्याची विनंती केली होती. आम्ही त्यांना आमच्या विनंतीचा विचार करून पुढील काही दिवसांत मार्गदर्शन करण्यास सांगितलं. राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
10/10
खातेवाटप जाहीर होताच त्याच दिवशी संध्याकाळी अजित पवार थेट सिल्वर ओकवर पोहोचले. त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणं आलं होतं. मात्र, शरद पवार यांच्या पत्नी आणि अजित पवार यांच्या काकी प्रतिभा पवार यांना भेटण्यासाठी अजित पवार सिल्वर ओकवर दाखल झाले होते. गेल्या चार दिवसांत तब्बल तीन वेळा अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली.
Sponsored Links by Taboola