Latur : अमित देशमुखांचे मंत्री संजय बनसोडे यांच्यावर शरसंधान, म्हणाले...
मतदाराला गृहीत धरणारे लोकप्रतिनिधी विचारांशी एकनिष्ठ का राहत नसतील? लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असे का वागतात? असा सवाल करत लातूरचे माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख यांनी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्यावर थेट टीका केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकशाहीत लोकांशी इमान राखणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे, लोकांशी इमान न राखणाऱ्या राजकारण्यांचे करायचे काय? याची चर्चा करण्याची वेळ आली आहे, असेही अमित देशमुख म्हणाले. उदगीर येथे झालेल्या बाजार समितीच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
आज उदगीर येथे झालेल्या बाजार समितीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काकाच्या नेतृत्वात दोघेही आमदार पुतणे इलेक्शन मोडमध्ये असल्याचं दिसून आलं.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाख़ाली जिल्ह्यात महायुतीच्या विरोधात फळी तयार करण्याचे काम सुरू केलं असून देशमुख बंधूंनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा असा संदेश दिला आहे.
लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करणारा देशमुख परिवार आता जिल्ह्याभरात ऍक्टिव्ह मोडमध्ये आला आहे. याची सुरुवात आज उदगीरात पहावयास मिळाली आहे.
उदगीरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संजय बनसोडे हे अजित पवार यांच्या साथीने महायुतीत सामील झाले, कॅबिनेट मंत्री झाले.
याचे शल्य राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सलत आहे अशी चर्चा आहे. नेमके हेच शल्य कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यानाही बोचत असल्याचे आज दिसून आले आणि तेच आजच्या उदगीरच्या कार्यक्रमात दिसून आले.
आज उदगीर येथे उदगीर कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार आणि वैशालीताई देशमुख बालिका बचाव योजनेची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी लातूरहून बोलावण्यात आलेले देशमुख परिवारातील तिन्ही नेते हजर होते.
त्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूरचे आमदार अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख हे व्यासपीठावर हजर होते. या सर्व नेत्यांच्या भाषणाचा रोख हा पक्षनिष्ठा आणि विचारसरणी यावर होता. अनेक सूचक वक्तव्य करत येत्या काळात उदगीर येथे सत्ताबदल झालाच पाहिजे, हा संदेश कका-पुतणे देशमुखांनी दिला.
आम्ही निवडून येतो आणि आम्ही तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात करतो त्याच क्षणाला आमच्या डोक्यात असे विचार येतात. त्या विचाराला आम्ही कधी सोडचिट्ठी देतो हे आम्हालाही लक्षात येत नाही असं अमित देशमुख म्हणाले.
उदगीरवरून मुंबईला जाताना एका पक्षाचा झेंडा आणि मुंबईवरून उदगीरला येताना दुसऱ्या विचाराचा झेंडा. असे का करतात माणसे हे लक्षात येत नाही' अशी टीका आमदार अमित देशमुख यांनी संजय बनसोडे यांच्यावर केली.