आधी एक पिलर खचला, नंतर हळूहळू पूलच कोसळला; अवघ्या 10 मिनिटांत गंगेत बुडाला 1700 कोटींचा पूल
Bihar Bridge Collapse: ओडिशा दुर्घटना ताजी असतानाच काल (रविवारी) बिहारमध्ये एक मोठी दुर्घटना झाली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण तब्बल 1700 कोटींचं नुकसान झालं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिहारच्या भागलपूर जिल्ह्यात रविवारी गंगा नदीवरील एक पूल कोसळला. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. गेल्या 9 वर्षांपासून या पुलाचं बांधकाम सुरू आहे.
पूल कोसळण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी एप्रिल 2022 मध्येही या पुलाचे काही पिलर कोसळले होते आणि वर्षभरानं पुन्हा एकदा तोच पूल कोसळला आहे.
पुलाच्या बांधकामासाठी किती निकृष्ट साहित्य वापरलं असावं, याचा अंदाज यावरून बांधला जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
600 कोटींमध्ये बांधण्यात येणारा पूल 1700 कोटी खर्चून बांधला जात होता. दोन महिन्यांनीच या पुलावरील वाहतूक सुरू होणार होती, मात्र पूल कोसळला.
पुलाच्या स्वरुपात सरकारचे 1700 कोटी रुपये पाण्यात विसर्जित झाले. दरम्यान, पूल कोसळल्यानंतर भ्रष्टाचाराचा पूल पडला, असं अनेक लोक म्हणत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, 10 मिनिटांतच एका बाजूला झुकलेला पूल गंगेत सामावला. तीन टेकूंवर उभे असलेले तब्बल 30 स्लॅब नदीत बुडाले. पूल नदीत कोसळल्यानंतर नदीत मोठे तरंग निर्माण झाले. बाजूला ये-जा करणाऱ्या नावांमधील प्रवाशांनी घाबरुन नदीत उड्या घेतल्या.
अनेकांनी किनाऱ्यावर असलेल्या बोटींकडे धाव घेतली. यापूर्वीही या पुलाचा काही भाग पडल्याचे नागरिकांनी सांगितलं.