Dilip Kumar Love Story : ...जेव्हा दिलीप कुमार यांनी भर कोर्टात दिली होती मुधबाला यांच्यावरील प्रेमाची कबुली!
हिंदी चित्रपट सृष्टीतील कोहिनूर म्हणजे, दिलीप कुमार. बॉलिवूडमधील First Khan ने आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या 98व्या वर्षी दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं मुंबईतील रुग्णालयात निधन झालं. दिलीप कुमार यांच्या फिल्मी कारकिर्दीसोबतच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच चर्चेत होतं. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत दिलीप कुमार यांचं आजही नाव जोडलं जातं. पत्नी सायरा बानो आणि त्यांची केमिस्ट्रीमुळे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांमध्ये त्यांचा समावेश केला जात असे. पण सायरा बानो यांच्याआधी दिलीप कुमार यांचं मधुबालाशी असलेलं नातं सर्वश्रुत आहेच. असं सांगण्यात येतं की, मधुबाला यांच्या वडिलांनी नकार दिल्यामुळे त्यांचं आणि दिलीप कुमार यांचं लग्न होऊ शकलं नाही. परंतु, हे लग्न न होण्यामागच्या कारणाचा खुलासा दिलीप कुमार यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री मधुबाला यांचे वडील एक प्रोडक्शन कंपनी चालवत होते आणि त्यांचं म्हणणं होतं की, लग्नानंतर दिलीप कुमार आणि मधुबाला यांसारखे दोन दिग्गज तारे त्यांच्या प्रोडक्शनसाठी काम करतील. पण, दिलीप कुमार यांचं म्हणणं होतं की, त्यांच्या काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. असं म्हणतात की, याबाबत मधुबाला यांचे वडील आणि दिलीप कुमार यांच्या वादही झाले होते.
दिलीप कुमार यांनी मधुबाला यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, मधुबाला यांची समजूत घालण्यास ते असमर्थ ठरले. असं सांगितलं जातं की, दिलीप कुमार यांनी मधुबाला यांना सांगितलं होतं की, जर तू आज आली नाहीस, तर आपण पुन्हा कधीच भेटणार नाही. तरिदेखील मधुबाला त्यांना भेटण्यासाठी आल्या नाहीत.
यादरम्यान, चित्रपट 'नया दौर'चं चित्रिकरण सुरु होतं. ज्यामध्ये मधुबाला आणि दिलीप कुमार मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचं बरचसं चित्रिकरण पूर्ण झालं होतं, तर काही भाग भोपाळमध्ये चित्रित करायचा होता. पण मधुबालाच्या वडिलांनी त्यांना भोपाळला पाठवण्यास नकार दिला होता, असं सांगितलं जातं.
या प्रकरणानंतर 'नया दौर' चित्रपटाच्या निर्माते बीआर चोप्रा यांनी मधुबाला यांच्यावर खटला दाखल केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलीप कुमार यांनी कोर्टात सर्वांसमोर मधुबाला यांच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे, हे मान्य केलं होतं. पण कोर्टात साक्ष देताना त्यांना बीआर चोप्रा यांची बाजू घेतली होती.
या घटनेनंतर मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या नात्यात मोठी दरी पडली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेनंतर बॉलिवूडची हिट जोडी कायमची एकमेकांपासून दूर झाली.