Chhagan Bhujbal : मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का? नाशिकच्या भूमीतून थेट बोलले, नाराज छगन भुजबळ यांचे 10 मोठे मुद्दे!
महायुतीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आलं आहे, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचाही समावेश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्रिमंडळातून वगळल्यामुळे छगन भुजबळांनी आणि त्यांच्या समर्थकांनी ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते, प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्याप्रकारे माझी अवहेलना करण्यात आली, त्याबद्दल मी नाराज आहे, असं ते म्हणाले.
छगन भुजबळ यांनी मंत्रिपदापेक्षा पक्षातील नेत्यांकडून देण्यात आलेल्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केली.
पक्षश्रेष्ठींना मी त्यांच्या हातामधील लहान खेळणं वाटतो का? ते सांगतील तेव्हा बसायचं, त्यांनी सांगितल्यावर उठायचं, ते म्हणाले की निवडणूक लढवायची? असा परखड सवाल विचारत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रुफल पटेलांना खडेबोल सुनावले.
मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मंत्रीपद कोणी नाकारलं हे शोधावं लागेल. प्रत्येक पक्षाचा निर्णय हा त्या पक्षाचा प्रमुख घेत असतो. भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, तसं शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. तसंच आमच्या पक्षाचा निर्णय अजित पवार घेतात, असं ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीला मला नाशिकमधून उभं राहायला सांगण्यात आलं होतं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे तु्म्ही लढावं, यासाठी आग्रही असल्याचे मला सांगण्यात आलं. मी त्यासाठी पूर्ण तयारीही केली होती, तेव्हा चांगले वातावरणही तयार झालं होतं, असं भुजबळ म्हणाले.
मात्र, ऐनवेळी आमच्या नेत्यांनी कच खाल्ली आणि माझं नाव घोषित केलं नाही. त्यामुळे मी स्वत:च लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्याचं भुजबळ म्हणाले.
त्यानंतर मी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांना राज्यसभेवर संधी द्यायची आहे, असं सांगण्यात आलं. तेव्हा देखील मी शांत बसलो, असंही ते म्हणाले.
राज्यसभेत माझ्या अनुभवाचा फायदा होईल, असं मी सांगितलं होतं. पण तेव्हा मला सांगण्यात आलं, तुम्ही महाराष्ट्रात असणं गरजेचं आहे.
मात्र, आता विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर आणि जिंकल्यानंतर मला राज्यसभेवर जायला सांगितलं जात आहे. मी मागत होतो तेव्हा मला संधी देण्यात आली नाही, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.