नागपूरः जिल्हा परिषदेच्या शाळेत 2005 पासून शिक्षकांची भरती बंद आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोठ्या संख्येत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आजच्या घडीला 700च्या वर शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे सांगण्यात येत आहे.


कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता. जिल्हा परिषदेने मानधनावर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांची नियुक्तीचा कदाचित पहिलाच प्रसंग आहे. 


जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मानधनावर शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सेस फंडातून 28 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यातून 50 शिक्षक नियुक्ती करण्यास समितीने मंजुरी प्रदान केली. या कंत्राटी शिक्षकांना मानधन म्हणून 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेच्या 1518 शाळांमध्ये सातशेवर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. बहुतांश दोन शिक्षकी शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. तर काही ठिकाणी एकही शिक्षक नाही.


अशा परिस्थितीत त्या शाळेमध्ये शेजारील दोन शिक्षकी शाळेतील एक शिक्षक घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. शासन शिक्षक भरती करेल तेव्हा करेल, परंतु स्थानिक पातळीवर जि. प. ने विद्यार्थ्यांच्या हितार्थ कंत्राटी तत्त्वावर गावातील सुशिक्षित बेरोजगारांना मानधन तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. एक शिक्षकी व विषय शिक्षकांची अत्यंत आवश्यकता असलेल्या शाळांमध्ये प्रथम प्राधान्याने कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.


राज्यात 40 हजार पदे रिक्त


राज्यात सध्या 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यात जिल्हा परिषद शाळांतील 27 हजार आणि माध्यमिक शाळांतील 13 हजार पदांचा समावेश आहे. या जागा टप्प्याटप्प्याने भरण्याची घोषणा शिक्षण विभागाने केली असून पहिल्या टप्प्यात 6,100 जागा भरणार असल्याची माहिती आहे. नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षकांची सुमारे 700 पदे रिक्त आहेत. त्यापैकी 50 पदे भरण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI