Yavatmal News : कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणासाठी किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल फोन (Mobile Phone) आले. मात्र त्याचा फायदा होण्याऐवजी बरेचदा वाईट परिणाम दिसून आले. किशोरवयीन मुलामुलींना व्यसन जडले. स्मार्टफोनचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊन अनेक मुलांना गेम्स, वाईट साईट पाहण्याचे व्यसन लागलेले असून हे दुष्परिणाम बान्सी गावातील नागरिकांना अनुभवास आले. त्यामुळे यवतमाळच्या पुसद तालुक्यातील बान्सी ग्रामपंचायतच्या (Gram Panchayat) ग्रामसभेत किशोरवयीन मुलांना मोबाईल फोन बंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बान्सी हा निर्णय घेणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. पुसद तालुक्यातील साग जंगलाला लागून असलेल्या बान्सी गावात 11 नोव्हेंबर रोजी ही ग्रामसभा पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला.
अठरा वर्षांखालील मुला-मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी
पंचायत राजमुळे लोकशाहीत ग्रामपंचायतला मोठे अधिकार प्राप्त झाले आहेत. ग्रामविकास योजना राबवताना ग्रामसभेतील ठरावांना महत्त्व आले आहे. ग्राम विकासासोबतच समाज स्वास्थ्य तंदुरुस्त राहण्यासाठी काही ग्रामपंचायती ग्रामसभेत आगळेवेगळे ठराव घेत अंमलबजावणी करतात. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बान्सी ग्रामसभेने असाच एक वेगळा प्रयोग केला आहे. किशोरावस्थेतील नवीन पिढी मोबाईल फोनच्या आहारी गेली आहे. त्याचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी बांशी ग्रामसभेत अठरा वर्षाखालील मुला-मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी घातली आहे.
ग्रामसभेत तीन महत्त्वाचे निर्णय
या ग्रामसभेत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये 18 वर्षाखालील मुलांना मोबाईल फोनची बंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याशिवाय शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे तसेच निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे तीनही ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेने घेऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
बान्सी गावाच्या निर्णयाचं कौतुक
आज एक वर्षाच्या मुलापासून तर वृद्धापर्यंत सर्वांना मोबाईल फोन ही गरज बनली आहे. मोबाईल फोनचा उपयोग योग्य केला तर फायदा होतो. आज मोबाईलमुळे विनाकारण वेळ वाया जात असल्याचा संशोधनाच्या माध्यमातून निष्कर्ष निघाला आहे. गावातील मुला-मुलींची पिढी यांचे आयुष्य उज्ज्वल घडवण्यासाठी बांशी या गावाने मोबाईल फोन बंदीचा आगळावेगळा निर्णय घेऊन तरुणाईला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक आहे.
संबंधित बातमी