Yavatmal Rain Update : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात विजेच्या कडकडटांसह पहाटेपासून जोरदार पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे वाघाडी नदीजवळचा रस्ता शनिवार (22 जुलै) पहाटेपासून पाण्याखाली आहे. दरम्यान वाघाडी नदीला पूर आल्याने पावसाचे पाणी नदीकाठच्या वस्त्यांमध्ये शिरले आहे. त्यामुळे वस्तीमधील 50 ते 60 घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.
दरम्यान या गावामध्ये एका घराची भिंत पडल्यामुळे शालू रवींद्र कांबळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. या वस्तीमधील 100 ते 150 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर या भागातील 50 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच पाच ते सहा जनावरे पाण्याखाली वाहून गेली आहेत. तर पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक हे घटनास्थळी पोहोचले आहेत.
यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्याला देखील पूर आला आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राळेगाव, मेंगापूर, वाऱ्हा, बोरी, आष्टा या भागातील शेतामध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे अंदाजे 200 हेक्टर वरील कपाशी, सोयाबीन, तूर ही पिके पाण्याखाली गेली आहेत. तर पुराच्या पाण्यामुळे जमिनीही खरडून गेल्या आहेत. या नाल्याच्या दुरुस्तीच्या कामाची मागणी दरवर्षी शेतकऱ्यांकडून केली जाते. पंरतु या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. वाऱ्हा आणि बोरी मेंगापूर पुलावरुन पाणी गेल्याने संपूर्ण शिवार जलमय झाल्याचं चित्र आहे. तर या ठिकाणी तातडीने पंचानामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट
दरम्यान यवतमाळ जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये 22 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
पावसामुळे अंकुरलेल्या पिकांना फटका
जिल्ह्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी पावसाने जोरदार बॅटिंग करण्यास सुरुवात केली. अनेक भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. पाऊस सतत बरसत असल्याने अंकुरलेल्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पावसामुळे नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. तसेच पावसामुळे अंकुरलेली पिकं पिवळी पडण्याची भीती आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.