PM Narendra Modi Visit Yavatmal : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (28 फेब्रुवारी) रोजी यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. तब्बल 45 एकरवर उभारण्यात आलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी (PM Modi) हे दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे. मात्र, त्यांच्या याच यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्याची एक आणखी चर्चा असून, मोदींसाठी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा 'लकी' असल्याचे बोलले जात आहे. त्याचं कारण म्हणजे 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीचे रणशिंग मोदींनी याच यवतमाळ जिल्ह्यातून फुंकले होते आणि त्यानंतर दोनही वेळ ते पंतप्रधान झाले.
- 20 मार्च 2014 ला लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी हे आर्णीजवळ असलेल्या दाभडी येथे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आले होते. त्यावेळी त्यांनी ‘चाय पे चर्चा’तून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. याच निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान बनले.
- पुढे 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला होता. 16 फेब्रुवारी 2019 रोजी यवतमाळच्या पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मोदी यवतमाळमध्ये आले होते. त्यावेळी देखील भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला आणि मोदी दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. अशात आता पुन्हा पंतप्रधान मोदी हे यवतमाळ येथे येत असून, मोदींसाठी यवतमाळ जिल्ह्याचा दौअर लकीअसल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वीचे आश्वासन अपूर्ण : ठाकरे गट
दरम्यान मोदींच्या याच दौऱ्याबाबत ठाकरे गटाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वी दोनदा यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करतांना मोदींनी दिलेले आश्वासन अजूनही पूर्ण झाले नसल्याचे आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी केला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात शेतकऱ्यांसोबत चाय पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमीभाव वाढवण्याचे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता केलेली नसल्याचा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आरोप आहे. शिवाय 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडामध्ये मोदींनी महिला बचत गटाच्या मेळाव्यामध्ये बचत गट आणि महिलांशी संबंधित आश्वासन दिले होते. त्याचीही पूर्तता केली नसल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :