Yavatmal Copy Case : दहावी आणि बारावीची (SSC-HSC Exam) परीक्षा कॉपी मुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून अभियान राबवलं जात आहे. त्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. मात्र यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील काटखेडा येथील उच्च माध्यमिक विद्यालयात या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडवला जात असल्याचं समोर आलं होता. आता या प्रकरणात केंद्र संचालकांसह आठ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमरावती शिक्षण मंडळाच्या सचिवांनी सोमवारी (6 मार्च) आदेश दिले.


खिडकीतून कॉपी पुरवण्यासाठी झुंबड


काटखेडा इथल्या उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान कॉपी बाहेरुन पुरवठा केला जात होता. काही विद्यार्थ्यांना वर्ग खोलीच्या खिडकीतून कॉपी पुरवण्यासाठी अक्षरशः झुंबड दिसून येत होती. शाळेच्या मागील बाजूने तर भिंतीवर उभे राहून कॉपी दिली जात होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा सर्व प्रकार खुलेआम सुरु असताना परीक्षा केंद्रावरील शिक्षक नेमके काय करत होते असा प्रश्न विचारला जात होता. या खुलेआम कॉपी प्रकरणाने शिक्षण विभागातील काही महाभागांच्या आणि शाळा प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. 




27 फेब्रुवारी रोजीच्या धाडीत पोतेभर कॉपी जप्त


तर त्याआधी 27 फेब्रुवारी रोजी पुसद उपजिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी याच विद्यालयात धाड टाकून पोतेभर कॉपी जप्त केली होती. यावेळी नऊ जणावर कारवाई करण्याची शिफारस उपजिल्हाधिकाऱ्यांनी अमरावती बोर्डाकडे प्रस्तवित केली होती. यानंतरही या केंद्रावर बिनधास्तपणे कॉपी सुरु असल्याचा प्रकार  उघडकीस आला होता.


9 मार्च रोजी शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवांसमोर सुनावणी


यावर आता अमरावती शिक्षण मंडळाच्या सचिवांनी काल कारवाईचे आदेश दिले आहेत. काटखेडा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकासह आठ पर्यवेक्षकांवर पुसद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आता 9 मार्च रोजी शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवांसमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यानंतर या सगळ्यांना शिक्षा होते की दंड ठोठावण्यात येते, हे स्पष्ट होणार आहे.


बुलढाणा पेपर फुटीप्रकरणी सात जण अटकेत


बुलढाण्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील बारावीच्या केंद्रावरुन गणिताचा पेपर फुटल्याची घटना समोर येताच राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 36 तासात सात आरोपींना अटक केली असून यातील चार आरोपी हे खाजगी शाळेतील शिक्षक आहेत. राजेगाव केंद्रावरुन पेपर सुरु होण्याआधीच समाज माध्यमात व्हायरल झाल्याची बातमी आली आणि राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.


हेही वाचा


Paper Leak : पेपरफुटीचं मायाजाल... बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आणखी दोन जण अटकेत, एकूण आरोपींची संख्या सातवर