Yavatmal Doctor Strike:  यवतमाळमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 2 प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर रुग्णाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली. दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्यावर यवतमाळमधील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. याआधीदेखील डॉक्टर अशोक पाल यांची हत्या झाली होती. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


यवतमाळमधील शासकीय रुग्णालयातील संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. प्रशिक्षणार्थी डॉक्टर वॉर्ड क्रमांक 24 मध्ये राऊंडवर होते. त्यावेळी रुग्णाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची जिल्हा रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.  डॉक्टर अभिषेक झा आणि डॉक्टर जेबीस्टन पॉल अशी जखमी डॉक्टरांची नावे आहेत. 


हल्ला झाला पण सुरक्षा रक्षक गायब


या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी डॉक्टर पूजा यांनी सांगितले की, संध्याकाळी वॉर्डमध्ये नॉर्मल सर्जरीचा राउंड सुरू होता. एका रुग्णाच्या प्रकृतीबाबत चर्चा करत असताना बाजूच्या रुग्णाने 
अचानकपणे डॉक्टरच्या जबड्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर तिथे असलेल्या सिनियर डॉक्टरने रुग्णाच्या हाताला पकडले. त्याच वेळी आम्ही इतरांनी सुरक्षा रक्षकांना आवाज दिला. मात्र, तिथे कोणीही नव्हते. डॉक्टरांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी डॉक्टरांनी केला. 


निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर


रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांवर रुग्णांकडून, रुग्णांच्या नातेवाईकांकडून याआधीदेखील हल्ले झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णालयाची तोडफोड करण्याचेही प्रकार घडले आहेत. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मु्द्दा सातत्याने चर्चेस येतो. मात्र, काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा निवासी डॉक्टरांवर हल्ला करण्याच्या घटना घडत असल्याने डॉक्टरांमध्ये रोष निर्माण झाला आहे. यवतमाळमधील घटनेत सुरक्षारक्षकांच्या भूमिकेवरही प्रश्न निर्माण झाले आहे. या हल्ल्यानंतर निवासी डॉक्टरांकडून राज्यभरात आंदोलन होण्याची शक्यता आहे. 


शुल्लक कारणातून डॉक्टरची हत्या


यवतमाळमधील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये डॉक्टर अशोक पाल या MBBS च्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात रात्री 8.30  वाजण्याच्या सुमारास मेडिकल परिसरातील रस्त्यावर हत्या झाली होती. दुचाकीवरून येणाऱ्यांचा धक्का लागल्याने डॉ. अशोक आणि त्या दुचाकीवरील तिघांचा शाब्दीक वाद झाला आणि त्यानंतर दुचाकी वरील एका आरोपीने डॉ. अशोक ला धारधार चाकूने छातीत आणि पोटात वार करून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.