Yavatmal News : शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी 25 टन साखरेसह ट्रकवर दरोडा टाकल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी ट्रक चालक आणि क्लिनरला मारहाण करुन साखरेसह ट्रक घेवून ते पसार झाले. ही घटना यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील धामणगाव रोडवरील करळगाव घाटात घडली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (Police) जलद गतीनं तपासचक्र फिरवीत तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.


पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सध्या यवतमाळ शहर पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे तर चोरी गेलेला ट्रक वनी येथे पकडला आहे.  शशिकांत उर्फ जाकी, विकी आणि लतीफला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आबहेत. उर्वरित आरोपींचा शोध एलसीबी आणि शहर पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सुरु आहे.


6 ते 7 चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावली 


ट्रक चालक योगेश रघुवंशी (राहणार मुलकी, जांब रोड) ट्रक क्लीनर दुर्गेश चिंढ्या ढोमणे (राहणार बुटीबोरी) हे दोघे ट्रक क्रमांक एमपी 48 एच 0788 मध्ये नागपूर येथून  सिमेंट घेऊन मध्य प्रदेशातील बैतुल शहरात गेले होते. येथील सिमेंट रिकामे केल्यानंतर नऊ एप्रिल रोजी सायंकाळी बैतूल जिल्ह्यातील शहापूर येथून त्यांनी ट्रकमध्ये  25 टन साखर भरून यवतमाळकडे निघाले. यवतमाळ शहरातील पी.जे राजा यांच्या गोदामात ही साखर आणली जात होती. दरम्यान सोमवार, 10 एप्रिल रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास धामणगाव रोडवर बिडकर फार्मजवळ वनविभागाच्या नगर वनजवळ एका ट्रकसमोर काळ्या रंगाची कार थांबली. या कारमधून 6 ते 7 अज्ञात चोरट्यांनी खाली उतरुन चाकूचा धाक दाखवत मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून नेली. यानंतर चोरट्यांनी ट्रकचालक आणि क्लिनरला जबरदस्तीने वाहनात बसवलं. यावेळी अंधाराचा फायदा घेत ट्रकचालकाने चोरट्याला रस्त्याच्या खाली ढकलून आपली सुटका केली. काही वेळ ट्रक आणि क्लिनर दुर्गेश दिसून न आल्याने त्यांनी त्याचा शोध घेतला. 


22 लाख 19 हजार 500 रुपयांचा मुदेमाल लंपास


अज्ञात चोरट्यांनी चाकूच्या धाकावर ट्रक आणि 25 टन साखर असा 22 लाख 19 हजार 500 रुपयांचा मुदेमाल लंपास केला. घटनेनंतर फिर्यादींनी यवतमाळ शहर पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर काही वेळाने क्लिनर दुर्गेश ढोमणेही तिथे पोहोचला. यावेळी फिर्यादीच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Sangamner Robbery : हातात बंदूक, तोंडावर रुमाल; अडीच लाख घेऊन चोरटे फरार, पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा