यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यवतमाळमध्ये विविध विकासकामांचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना मोदींनी "जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा" असे अभिवादन करून भाषणाला मराठीत सुरुवात केली.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?
- 10 वर्षांपूर्वी चाय पर चर्चा करायला आलो तेव्हा तुम्ही NDA ला 300 पार केले.. 2019 मध्ये आलो तेव्हा तुम्ही खूप प्रेम दिले, तेव्हा तुम्ही NDA ला 350 पार पोहोचवले. आणि आता 2024 मध्ये जेव्हा विकास पर्वाला आलो आहे. तेव्हा देशात एकच आवाज आहे, अब की बार 400 पार.
- संपूर्ण विदर्भात ज्या पद्धतीचं प्रेम मिळत आहे, ते पाहता हे निश्चित आहे यंदा NDA 400 पार.
- आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोकं आहोत. शिवाजी महाराजांनी नेहमी देशाची चेतना जागी करण्यासाठी काम केले. आम्हीही त्यासाठी काम करत आहोत. देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला विकसित बनवण्याचं माझा स्वप्न आहे. त्यासाठी चार प्राधान्य घटक आहे.
- गरीब , युवा, शेतकरी, महिला हे सशक्त झाले तर देश विकसित होईल. आज या चारही घटकांसाठी काम झाले आहे.
- विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. जेव्हा यूपीए सरकार होते, तेव्हा काय अवस्था होती?. तेव्हा तर महाराष्ट्रातले कृषी मंत्री (शरद पवार) होते. तेव्हा दिल्लीतून शेतकरी पॅकेज जाहीर व्हायचे मात्र शेतकऱ्यांच्या हाती पैसे जात नव्हते.
- आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचली आहे. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. हेच काँग्रेस शासन असते, तर 21 हजार कोटी पैकी 18 हजार कोटी खाऊन टाकले असते.
पीएम मोदी यांनी आज शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) अंतर्गत 21,000 कोटींहून अधिक रुपयांचा 16 वा हप्ता जारी केला.या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या खात्यात 3 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. सुमारे 3,800 कोटी रुपयांच्या 'नमो शेतकरी महासम्मान निधी'चा दुसरा आणि तिसरा हप्ताही पंतप्रधानांनी वितरित केला आहे. महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला.
4900 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन
या योजनेंतर्गत, महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला 6000 रुपये अतिरिक्त रक्कम मिळते. यासोबतच पंतप्रधानांनी राज्यातील 4,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे राष्ट्र विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. पीएमओच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील 5.50 लाख महिला स्वयं-सहायता गटांना (SHGs) 825 कोटी रुपयांचा रिव्हॉल्व्हिंग फंड देखील वितरित करण्यात आला. ही रक्कम राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM) अंतर्गत भारत सरकारने प्रदान केलेल्या फिरत्या निधीव्यतिरिक्त आहे.
आयुष्मान कार्डचे वितरण सुरू
ग्रामीण स्तरावर महिलांच्या नेतृत्वाखालील सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देऊन गरीब कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न वाढवण्यासाठी हा फिरता निधी दिला जातो. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्डचे वितरण सुरू केले आहे. महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान मोदी आवास योजना सुरू केली. पीएम मोदींनी या योजनेअंतर्गत 2.50 लाख लाभार्थ्यांना 375 कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित केला. एवढेच नाही तर महाराष्ट्रात 1,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या