Yavatmal News : झटपट पैसे कमविण्याच्या नादात गुन्हेगार नवनवीन शक्कल लढवत असतात. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही येतं, तर कधी हा प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट येत असतो. असाच काहीसा प्रकार यवतमाळच्या गुंज येथे काही चोरट्याच्या (Crime News) बाबतीत झाला आहे. सोन्या-चांदीचे दागिने चमकवून आणि स्वच्छ करून देण्याच्या बहाण्याने महिलांचे दागीने हातोहात लंपास करणाऱ्या एका चोरट्याला रंगेहात अटक केली आहे. बिहार राज्यातील भागमपूर येथील एका इसमाला आज गुंज येथे अटक करण्यात आली आहे. जीवनदीप कुमार गोपाल असे अटक केलेल्या ठकबाजाचे नाव आहे. त्याचा एक सहकारी मात्र घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. तर यावेळी ग्रामस्थांनी त्याला गुंज तांडा येथे चांगलाच चोप देऊन महागाव पोलिसांच्या स्वाधीन केलंय.


प्रकरण उजेडात आलं अन् ग्रामस्थांनी दिला जबर चोप


मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील संशयित आरोपी जीवनदीप कुमार आणि त्याचा सहकारी गुंज तांडा येथे शिवाजी रामसिंग राठोड यांच्या घरी पोहचले. दरम्यान, त्यांनी जुने दागिणे पॉलिश करून स्वच्छ करून देतो, असे त्यांनी महिलांना सांगितले. खात्री पटण्यासाठी त्यांनी घरातील पितळेचा गडवा पावडर लाऊन चमकून दिला. दरम्यान, एका महिलेच्या पायातील चांदीची तोरडी आणि एका महिलेच्या दंडातील 20 तोळे वजनाच्या चांदीच्या कड्याला पावडर लावले आणि यात चांदीचे कडे भस्म झाल्याचा बहाणा या ठकसेनांनी केला. पावडर लावलेली तोरडीही काळी पडली. घडलेला प्रकार लक्षात येताच महिलांनी आरडाओरड केला आणि त्यानंतर संधी मिळताच दोन्ही भामट्यांनी पळ काढला. मात्र ग्रामस्थांनी जीवनदीप कुमार यास पकडून चांगलेच बदडून काढले. त्यानंतर गावकऱ्यांनी आरोपीस महागाव पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटणेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस सध्या पुढील चौकशी करत आहे.


वनरक्षक आणि वन मजूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील एका लाचखोर वनरक्षकासह एका वनमजूराला ५ हजाराची लाच घेताना गोंदिया एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. तुलसीदास चव्हाण आणि देवानंद कोसबे असे लाचखोर वनरक्षक आणि वनमजूराचे नाव आहे. तक्रारदार यांची सडक अर्जुनी तालुक्यातील दिल्ली येथे वन जमीनीला लागून शेती आहे. दोन आठवड्यापुर्वी तक्रारदार यांनी शेतालगतच्या वन जमिनीतील झाडे-झुडपे तोडून शेती करण्याकरीता जमिनीची मशागत केली होती. १३ सप्टेंबरला वनरक्षक चव्हाण याने तक्रारदार यांना फोन करून वन विभागाच्या कार्यालयात बोलावून घेत त्यांना शासकीय वन जमिनीवरील झाडे झुडपी तोडून अतिक्रमण केल्याबाबत नोटीस दिली आणि शासकीय वन जमिनीवरील झाडे-झुडपे तोडल्याबाबत कारवाई न करण्याकरिता 20 हजाराच्या लाचेची मागणी केली.


मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दिली होती. त्यानंतर पडताळणी दरम्यान आरोपी वनरक्षक याने पंचासमक्ष 20 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10 हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, आरोपी वनरक्षक याच्या सांगण्यावरून आरोपी वनमजूर याने लाच रकमेतील पहिला हप्ता 5 हजार रुपये तक्रारदाराकडून स्वीकारला. यावेळी पथकाने दोन्ही संशयितांना रकमेसह रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी वनरक्षक ववनमजूर यांच्याविरूद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या