World Oldest Tortoise Birthday : जोनाथन (Jonathan Seychelles Giant Tortoise) हे पृथ्वीवरील सर्वात वृद्ध कासव असल्याची अधिकृत घोषणा आधीच करण्यात आली आहे. गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) या कासवाची नोंद आहे. या कासवाचं वय 190 वर्ष आहे. हे कासव इतिहासाचा साक्षीदार आहे. हे कासव पृथ्वीवरील सर्वात वृद्ध असलेला जिवंत प्राणी आहे. जोनाथन (Jonathan) दक्षिण अटंलांटिकमधील सेंल हेलेना येथे आपला 190 वा वाढदिवस साजरा करत आहे. याच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नेपोलियनच्या मृत्यूनंतर या कासवाचा जन्म झाला होता.


जोनाथन या कासवाच्या जन्माबाबत स्थानिक प्रशासनाकडे कोणतेही दस्ताऐवज उपलब्ध नाहीत. जोनाथनचं वय याहून अधिक असण्याचीही शक्यता आहे. मात्र, शास्त्रज्ञांनी कासवाच्या कवचावर केलेल्या संशोधनाच्या आधारे या कासवाचा जन्म 1832 मध्ये झाला असावा. जोनाथन हे सेंट हेलेनाच्या गव्हर्नरचे अधिकृत निवासस्थान असलेल्या प्लांटेशन हाऊस येथे आरामदायी जीवन जगत आहेत. यासोबतच डेव्हिड, एम्मा आणि फ्रेड अशी आणखी तीन वृद्ध कासवंही येथे राहतात. 1838 मध्ये जोनाथनचा पहिला फोटो काढण्यात आल्याचे सांगितलं जातं. 


जोनाथनच्या वाढदिवसाची जय्यत तयारी


सेंट हेलेना येथे जोनाथनच्या वाढदिवसानिमित्त विशेष टपाल तिकिटाच्या प्रकाशन करण्यात येणार आहे. याशिवाय इतरही अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रविवारी जोनाथनच्या वाढदिवसानिमित्त जंगी सेलिब्रेशन होईल. यावेळी केक कापला जाईल. जोनाथनच्या केअर टेकरने 2017 मध्ये एएफपीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, जोनाथनला गाजर, काकडी, सफरचंद आणि नाशपाती आवडतात.


पाहा अधिक फोटो : जगातील सर्वात जुनं कासव (World Oldest Tortoise)


जोनाथन 190 वर्षांचा आहे. त्याला सुमारे 50 वर्ष वय असलेल्या एम्मा  नावाच्या मादी कासवाचा सहवास आवडतो.  जोनाथन एम्माच्या प्रेमात आहे, तर तो कधी इतर मित्रांसोबतही खेळतो. तत्कालीन गव्हर्नर लिसा फिलिप्स यांनी सांगितलं की, जोनाथनने अजूनही मादी कासवांच्या संगतीला प्राधान्य देतो.


अनेक बदलांचा साक्षीदार


या वर्षाच्या सुरुवातीला, जोनाथनच्या नावाची जगातील सर्वात जुना जिवंत प्राणी म्हणून गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. आता जोनाथनच्या नावावर सर्वात जुने कासव म्हणून विक्रम आहे. जोनाथनचे मुख्य केअर टेकर, सेवानिवृत्त पशुवैद्य जो हॉलिन्स म्हणाले की, तो येथील एक स्टार आहे. अनेक पर्यटक त्याला पाहण्यासाठी येतात. जोनाथन येथील अनेक ऐतिहासिक बदलांचा साक्षीदार आहे. महायुद्धं, ब्रिटीश साम्राज्याचा उदय आणि पतन, अनेक राज्यपाल, राजे आणि राण्या या सर्वांचा जोनाथन साक्षीदार आहे. जोनाथन अजूनही येथे आहे आणि जीवनाचा आनंद घेत आहे. इतकंच नाही तर सेंट हेलेनाच्या अधिकाऱ्यांनी आधीच त्याच्या मृत्यूनंतर योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत जोनाथनचे कवच वंशजांसाठी जतन केलं जाईल.