What is Solar Strom : पृथ्वीला (Earth) मोठा धोका निर्माण झाला आहे. येत्या 24 तासांत पृथ्वीवर सौरवादळ धडकण्याची शक्यता आहे. आता  पृथ्वीवर सौर वादळाचा धोका आहे. नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA), अंतराळ हवामानावर नजर ठेवणाऱ्या यूएस एजन्सीनुसार, 4 ते 5 ऑगस्ट दरम्यान अनेक सौरवादळे पृथ्वीवर आदळण्याची शक्यता. तीव्र सौर वादळ धडकल्यास पृथ्वीचं मोठं नुकसान होऊ शकते.


वादळ किती धोकादायक असेल?


SpaceWeather.com च्या अहवालानुसार, "लहान G1 वर्ग भूचुंबकीय वादळे 4-5 ऑगस्ट रोजी येऊ शकतात, ज्यामध्ये एक किंवा अधिक कमकुवत सौरवादळे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर आदळण्याची शक्यता आहे. या सौरवादळांमुळे गंभीर नुकसान देखील होऊ शकते.


उद्या सौरवादळ धडकण्याची शक्यता


सध्या, सूर्याच्या पृथ्वीच्या बाजूला सुमारे 9 सक्रिय सनस्पॉट (Sun Spot) आहेत. याचा अर्थ असा की, यातून कधीही सौरऊर्जेचा उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. जर हे सोलर फ्लेअर म्हणजेच सनस्पॉट मोठे असतील तर ते मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा आणि सौर ज्वाला अवकाशात सोडू शकतात, यामुळे शेवटी सौर वादळ तयार होईल.


पृथ्वीवर सौरवादळ धडकल्यास काय परिणाम होईल?


याचा परिणाम वायरलेस कम्युनिकेशन्स आणि GPS सेवांवर होऊन या सेवांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. यामुळे एअरलाइन्स, नेव्हिगेटर्स, हॅम रेडिओ कंट्रोलर आणि ड्रोन ऑपरेटरसाठी समस्या उद्भवू शकतात. सौर वादळामुळे विमान उड्डाणांमध्ये विलंब होऊ शकतो, जहाजांची दिशा बदलू शकते.


सौरवादळ म्हणजे काय?


सौर स्फोट (Sun Explosion) किंवा सौरवादळ (Sun Strom) म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या सौर ज्वाळा (Sun Flare) तयार होतात. सूर्यावरील चुंबकत्वामुळे तापमान वाढून हे स्फोट होतात. या स्फोटामुळे नंतर सौर वादळ तयार होतं. सूर्यावर होणारे स्फोट अणुबॉम्बइतके शक्तिशाली असू शकतात, यावरून तुम्ही या धोक्याचा अंदाज लावू शकता. सूर्यावरील वायूंचे घर्षण होऊन स्फोट होतात, तेव्हा त्यातून ज्वाला बाहेर पडतात, याला सौर ज्वाळा (Sun Flare) म्हणतात. या ज्वाळानंतर ते पृथ्वीच्या तसेच सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या दिशेने फेकल्या जातात.


सनस्पॉट म्हणजे काय?


सनस्पॉट म्हणजे सूर्यप्रकाशातील गडद भाग. चुंबकत्वामुळे सूर्यावर जे गडद भाग (डाग किंवा ठिपका) (Sunspot) तयार होतो याला 'सनस्पॉट' असं म्हणतात. सनस्पॉट्स काही तासांपासून काही महिने टिकू शकतात. सर्व सनस्पॉट्समुळे सौर ज्वाला तयार होत नाहीत, मात्र याचा पृथ्वीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.


सौर वादळांचे चार प्रकार 


अंतराळ हवामानाशी संबंधित सौर वादळे चार मुख्य घटकांमध्ये विभागली जातात : सौर फ्लेअर्स, कोरोनल मास इजेक्शन, उच्च-गती सौर वारा आणि सौर ऊर्जा कण.