Weight Loss Drug Wegovy : अमेरिकेनंतर आता जर्मनीमध्ये वजन कमी करण्यासाठीच्या औषधाला मंजुरी देण्यात आली आहे. लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त जर्मनीतील नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. आता जर्मनीमध्ये वजन कमी करण्यासाठीच्या विगोवी (Wegovy) औषधाला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जुलै महिन्याअखेरीस है औषध जर्मनीतील नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. लठ्ठपणाने त्रस्त नागरिकांसाठी हा शेवटचा आशेचा किरण असल्याचं सांगितलं जात आहे.


वजन कमी करण्यासाठी फायदेशीर औषध


नोवो नॉर्डिस्क (Novo Nordisk) फार्मासिटिकल कंपनीचं विगोवी (Wegovy) हे वजन कमी करणारे औषध जुलैच्या अखेरीस उपलब्ध होईल. जर्मनीआधी अमेरिकेमध्ये 2021 साली या औषधाला मान्यता मिळाली आहे. सध्याच्या काळात अनेक जण लठ्ठपणा आणि वजन वाढण्याच्य समस्येने त्रस्त आहेत. विगोवी औषधाच्या परिणामामध्ये आढळलं आहे की, हे औषध 15 टक्क्यांनी लठ्ठपणा कमी करण्यात मदत करते. मात्र, अमेरिका आणि जर्मनीमध्ये मंजुरी मिळालेलं हे औषध भारतात केव्हा उपलब्ध होईल, हे पाहावं लागेल.


लठ्ठपणामुळे मृत्यूचा धोका वाढतोय


जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, दरवर्षी 4 दशलक्षाहून अधिक लोक जास्त वजन किंवा लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त असून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. प्रौढ आणि मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. अहवालानुसार 1975 ते 2016 पर्यंत, 5-19 वयोगटातील मुले आणि किशोरवयीन मुलांमधील लठ्ठपणा जागतिक स्तरावर चार टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत वाढल्याचं निदर्शनास आलं. 


लठ्ठपणा एक गंभीर समस्या


लठ्ठपणा किंवा जास्त वजन ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे, यामुळे इतर गंभीर आजार जडतात आणि हे मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहे. यामध्ये हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेह यांचा समावेश आहे. इतकंच नाही तर लठ्ठपणामुळे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोकादेखील संभवतो आहे. अशा परिस्थितीत हे औषध या गंभीर आजारांचा धोकाही बऱ्याच अंशी कमी करू शकते.


वजन कमी करण्यासाठीचं औषध


लठ्ठपणा कमी करण्याच्या या औषधाचे नाव विगोवी आहे. हे फार्मास्युटिकल कंपनी नोवो नॉर्डिस्कने बनवलं आहे. हे मधुमेहावरील औषध आहे. डायबिटीजमध्ये वापरल्या जाणार्‍या सिमाग्लुटाइड या औषधाचा हा थोडा बदललेला प्रकार आहे. या औषधाची चाचणी 14 महिन्यांहून अधिक काळ करण्यात आली. या चाचणीमध्ये, ज्या लोकांचे वजन जास्त होते किंवा जे लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करत होते, त्या व्यक्तींना विगोवी औषध घेतल्यानंतर त्यांचं सरासरी वजन 15 टक्क्यांनी कमी झालं. 


हे औषध अनेकांसाठी शेवटचा आशेचा किरण


रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, वजन कमी करण्यासाठी डाएट आणि व्यायामाच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर निराश झालेल्या, हॅम्बुर्गमधील 41 वर्षीय जेसिका लेन्थ यांनी या औषधासाठी पैसे बाजूला ठेवण्यास सुरुवात केली आहे. या पैशंमधून त्या हे औषध विकत घेणार आहेत. हे औषध त्यांच्यासाठी शेवटचा आशेचा किरण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.