लाहोर : भारतातील अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसण्याची पाकिस्तानची वाईट सवय आहे. नसीरुद्दीन शहा यांच्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटते या वक्तव्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाहोरमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात इम्रान खान बोलत होते.


"भारतात अल्पसंख्यांकांना इतर नागरिकांप्रमाणे वागणूक मिळत नसल्याचं भारतातील काही लोक म्हणत आहेत. त्यामुळे अल्पसंख्यांकांसोबत कसं वागायचं हे आम्ही मोदी सरकारला दाखवू, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटेल आणि त्यांना समान अधिकार मिळतील", असं आश्वासन इम्रान खान यांनी यावेळी दिलं.


दुर्बल घटनकांना न्याय दिला नाही तर असंतोष पसरु शकते. ही बाब सिद्ध करण्यासाठी त्यांनी बांगलादेशचं उदाहरण दिलं. पूर्व पाकिस्तानातील लोकांना न्याय मिळाला नाही, त्यामुळेच बांगलादेशचा जन्म झाल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं.


पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना योग्य न्याय मिळावा, यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील असणार आहे. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा दृष्टीकोणही हाच होता.


काय म्हणाले होते नसीरुद्दीन शहा?


आता गाईचा जीव माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाचा झाला आहे. समाजात विष पसरलं आहे. या परिस्थितीची मला खूप भीती वाटते. अचानक जमावानं माझ्या मुलांना घेरलं आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असा प्रश्न त्यांना विचारला, तर काय होईल. मला माझ्या मुलांची चिंता वाटते, अशा शब्दांत देशातील परिस्थितीबद्दल नसरुद्दीन शहा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


देशातील सध्याच्या परिस्थितीचा चीड येते, लोकांनादेखील याबद्दल संताप वाटला पाहिजे. हे आमचं घर आहे आणि यातून कोण आम्हाला बाहेर काढू शकतो, असा विचार लोकांच्या मनात यायला हवा,' असेही शहा यांनी म्हटले आहे.