Turkey Earthquake News : तुर्कीमध्ये सोमवारी आलेल्या विनाशकारी भूकंपात तुर्की उद्धवस्त झाला आहे. सगळीकडे हाहा: कार उडाला आहे. या भूकंपाची तीव्रता दर्शवणारे अनेक फोटो, व्हिडिओ समोर येऊ लागले आहेत. लोकांनी एकमेकांचे प्राण वाचवण्यासाठी केलेली धडपडही व्हिडिओत कैद झाली आहे. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. लाइव्ह रिपोर्टिंग करताना एका पत्रकाराने लहान मुलीचे प्राण वाचवले.
तुर्कीमध्ये भूकंप येऊन गेल्यानंतर पत्रकार युकसेल अकालन घटनास्थळी जाऊन वार्तांकन करत होते. युकसेल हा मालट्या भागातील रस्त्यांवरून लाइव्ह रिपोर्टिंग करत होता. त्याच वेळी त्याच्या पायाखालची जमीन हलू लागली. भूकंपाचे धक्के जाणवताच युकसेल अकालान आणि त्यावेळी रस्त्यांवर असलेले इतर नागरिकांची पळापळ सुरू होते. कॅमेरामन भूकंपाची घटना कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी एक इमारत कोसळण्याचा मोठा आवाज येतो. हा व्हिडिओ सीबीएस न्यूजने जारी केला आहे.
इमारत जमीनदोस्त झाली
'रॉयटर्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, युकसेन अकालनने त्यांना सांगितले की, आम्ही ज्यावेळी मदत आणि बचाव कार्याचे वार्तांकन सुरू केले तेव्हा भूकंपाचे दोन झटके जाणवले. माझ्या डावीकडील इमारत कोसळली. त्यावेळी खूप धूळ उडाली. त्यावेळी एक धुळीने माखलेला स्थानिक माझ्या दिशेने धावत असल्याचे दिसले. त्याच वेळी एक लहान मुलगी संकटात दिसली. त्यावेळी तिला ताबडतोब तिथून उचलून सोबत घेतले असल्याचे त्याने सांगितले.
भूकंपाचे 39 धक्के
गेल्या 24 तासात या देशात भूकंपाचे तब्बल 39 धक्के बसले असून आतापर्यंत 1700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी पहिला भूकंपाचा धक्का जाणवला. त्यानंतर दुपारी 1 वाजून 24 मिनीटांनी दुसरा धक्का बसला. आतापर्यंत सात हजाराहून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरुच आहेत. तुर्कीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू झालं आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीसह सीरियामध्ये शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. या भूकंपाचा फटका सर्वच प्रमुख शहरांना बसल्यामुळे जनजीवनही विस्कळीत झालं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: