Vladimir Putin On PM Narendra Modi: रशियाचे (Russia) राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी गुरुवारी (7 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं कौतुक केलं आणि म्हटलं की, त्यांना घाबरवलं जाऊ शकत नाही किंवा राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध निर्णय घेण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही. पुतिन यांनी पंतप्रधान मोदींच्या कठोर भूमिकेचं कौतुक केलं.


एएनआय न्यूज एजन्सीनुसार, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयानं चौदाव्या व्हीटीबी इन्व्हेस्टमेंट फोरम 'रशिया कॉलिंग'मध्ये पुतिन यांच्या हवाल्यानं म्हटलं की, "मी कल्पना करू शकत नाही की, मोदी भारताच्या आणि भारतीय लोकांच्या राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध कोणतंही पाऊल उचलतील आणि असं करण्यासाठी त्यांना धमकावलं जाऊ शकतं किंवा निर्णय घेण्यास भाग पाडलं जाऊ शकतं. आणि त्यांच्यावर सध्या असा दबाव आहे, मला माहीत आहे. तसं पाहिलं तर ते आणि मी याबद्दल कधीच काहीही बोलत नाही. मी फक्त बाहेरून काय घडत आहे, ते पाहतोय आणि खरं सांगायचंच झालं तर काहीवेळा भारताच्या राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्याच्या त्यांच्या कठोर भूमिकेनं मला आश्चर्यच वाटतं."


पंतप्रधान मोदींचं राष्ट्रहिताचं धोरणच भारत-रशिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांची गॅरंटी 


पुतीन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "मी सांगू इच्छितो की, रशिया आणि भारत यांच्यातील संबंध सर्व दिशांनी उत्तरोत्तर विकसित होत आहेत आणि पंतप्रधान मोदींनी स्वीकारलेलं धोरण हे त्यांचं मुख्य हमीदार आहे."


ते खरंच योग्य काम करतायत : व्लादिमीर पुतिन


भारत आणि रशिया यांच्यातील वाढत्या व्यापाराबाबत रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले की, "गेल्या वर्षी दोन्ही देशांमधील व्यापार प्रतिवर्ष 35 अब्ज डॉलर्स होतं आणि या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत व्यापार 33.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे." म्हणजेच, व्यापारात झालेली वाढ लक्षणीय असेल.'' पुतिन पुढे बोलताना म्हणाले की, ''होय, आम्हा सर्वांना हे समजलं आहे की, रशियन ऊर्जा संसाधनांवर सवलतीमुळे भारताला मोठ्या प्रमाणात प्राधान्य मिळतं. बरं, ते खरोखर योग्य गोष्ट करत आहेत."


"त्यांच्या जागी मी असतो, अशी परिस्थिती निर्माण झाली असती तर मीही असंच केलं असतं, असंही पुतिन म्हणाले. ते पैसे कमवतात आणि अगदी बरोबर आहे. पण अर्थातच हे पुरेसं नाही. आपल्याकडे भरपूर संधी आहेत. क्रयशक्ती समता आणि आर्थिक परिमाण या आधारावर जगातील अर्थव्यवस्थांच्या जागतिक क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे आणि रशिया पाचव्या स्थानावर आहे.


"भारताशी व्यापार वाढवणं योग्य ठरेल"


"अर्थव्यवस्थांच्या जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या देशांमध्ये चीन, अमेरिका, भारत, जपान आणि रशिया यांचा समावेश होता. जर चीनसोबतची आमची व्यापार उलाढाल या वर्षी 200 अब्जांच्या जवळपास असेल, तर आमच्यासाठी भारतासोबत व्यापार पुढे वाढवणं योग्य ठरेल.", असं पुतिन म्हणाले. 


दरम्यान, महत्वाचे म्हणजे, रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू झाल्यानंतर, अमेरिकेसह पश्चिमेकडील देशांनी रशियावर कठोर निर्बंधही लादले होते. मात्र असे असतानाही, भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी केलं आहे. यावरुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी वक्तव्य केलं आहे. याबाबत बोलताना पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचं भरभरून कौतुक केलं आहे.