Hottest Year 2023: 2023 वर्षानं उष्णतेचे सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढले असून हे वर्ष आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष (Warmest Year) ठरलं आहे. जागतिक हवामान संघटनेकडून (World Meteorological Organization) COP28 च्या पहिल्या दिवशी यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला. हवामान बदल आणि सध्या सुरु असलेल्या एल निनोच्या परिस्थितीच्या एकत्रित परिणामामुळे ऑक्‍टोबरच्या अखेरपर्यंत पृथ्वी आधीच 1.4 अंश सेल्सिअस पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा (1850-1900) अधिक उष्ण असल्याचं संशोधनातून निष्पन्न झालं होतं. तसेच, जगात हरितगृह वायूचं प्रमाणही सतत वाढत असल्याचं निरीक्षण देखील संशोधनातून समोर आलं आहे. त्याचप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान आणि समुद्राच्या पातळीत वाढ नोंदवली गेल्याचं देखील अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे. अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाचं आच्छादन घटल्याचं अहवालात नमूद केलं गेलं आहे. 


बंगालच्या उपसागरातील मोखा चक्रीवादळ 2023 मधील जागतिक स्तरावरील सर्वात तीव्र चक्रीवादळांपैकी एक होतं. जागतिक हवामान संघटनेनं (WMO) प्रकाशित केलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. दरम्यान, COP28 परिषदेत सहभागी झालेले नेते या अहवालासंदर्भात काय भाष्य करतात याकडे सर्वच देशांचे लक्ष लागलेलं आहे. तसेच, सीओपी-28 मध्ये क्लायमेट फायनान्ससंदर्भात देखील चर्चा होणार असून विकसनशील देशांचं विकसित देशांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. 


संयुक्त राष्ट्रांनी 30 नोव्हेंबर रोजी अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार, यंदाचं वर्ष आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे आणि ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी, तसेच त्याच्या पार्श्वभूमीवर होणारा विनाश रोखण्यासाठी तातडीची कारवाई करण्याची गरज असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्रांनी आवाहनही केलं आहे.


उष्णतेचा तुटलेला रेकॉर्ड म्हणजे, बधिर करणारा आवाज : डब्ल्यूएमओचे प्रमुख


UN च्या जागतिक हवामान संघटनेनं इशारा दिला आहे की, 2023 मध्ये हवामानातील अनेक विक्रम मोडू शकतात, अत्यंत वाईट हवामानामुळे 'विनाश आणि निराशेच्या खुणा' सोडल्या आहेत. याबाबत बोलताना, "हा तुटलेल्या रेकॉर्डचा बधिर करणारा आवाज आहे.", असं डब्ल्यूएमओचे प्रमुख पेटेरी तालास म्हणाले आहेत. "ग्रीनहाऊस गॅसची पातळी विक्रमी उच्च पातळीवर आहे. जागतिक तापमान विक्रमी उच्च पातळीवर आहे. समुद्राच्या पातळीत वाढ विक्रमी आहे. अंटार्क्टिक समुद्रातील बर्फ विक्रमी पातळीवर आहे.", असंही त्यांनी यावेळी सांगितलं.