वॉशिंग्टन : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालानंतरही राजकीय तणाव सुरु आहे. निवडणूक निकालात फेरफार झाल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटल बिल्डिंगबाहेर गर्दी करुन जोरदार गोंधळ घातला. यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. परंतु त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, परिणामी संसदेचं कामकाज थांबवावं लागलं. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर गोंधळही घातला. या घटनेवर देशभरात टीका केली जात आहे.
तर दुसरीकडे निवडून आलेले अध्यक्ष जो बायडन म्हणाले की, मी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन करतो की, त्यांनी आपली शपथ पूर्ण करुन संविधानाचं संरक्षण करावं आणि हा वेढा संपवण्याची मागणी करावी.
कॅपिटल बिल्डिंगवर झालेला गोंधळ हा देशद्रोह असल्याचं जो बायडन म्हणाले. "मी स्पष्ट करतो की, कॅपिटल बिल्डिंगबाहेर जो गोंधळ झाला आम्ही तसे नाहीत. कायदा न पाळणाऱ्यांचीही संख्या आहे, असं बायडन म्हणाले.
हिंसेत महिलेचा मृत्यू, अनेक जखमी
कॅपिटल बिल्डिंगबाहेर ट्रम्प समर्थकांची पोलिसांसोबत झटापटही झाली. या हिंसाचारात एका नागरिकाचा गोळी लागून मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याचं समजतं. वॉशिंग्टन डीसी पोलीस प्रमुखांनी या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. यूएस कॅपिटलमध्ये एका महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला तर हिंसाचारात अनेक अधिकारी जखमी झाले आहेत.
ट्रम्प यांचं समर्थकांना शांततेचं आवाहन
दरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. शांततेत आंदोलन करण्याचा आवाहन करताना ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात हिंसाचार होऊ नये. लक्षात ठेवा आपण कायदा-सुव्यवस्थेचा पक्ष आहोत.
फेसबुकने ट्रम्प यांचा व्हिडीओ हटवला
ट्विटरपाठोपाठ फेसबुकनेही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडीओ हटवला आहे. यूएस कॅपिटलमध्ये हिंसेदरम्यान ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित केलं होतं. फेसबुकचे अधिकारी गाय रोसेन म्हणाले की, आम्ही ट्रम्प यांचा व्हिडीओ हटवला आहे. कारण त्यांचा व्हिडीओमुळे यूएस कॅपिटलमधील हिंसेंला प्रोत्साहन देते असं आमचं मत आहे.