बामको: फ्रान्सने मालीमध्ये केलेल्या एका हवाई हल्ल्यात अल-कायदा या या दहशतवादी संघटनेच्या 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची बातमी फ्रान्स सरकारने दिली आहे. हा हल्ला शुक्रवारी आफ्रिकेतील बुर्किना फासो आणि नायजेरच्या सीमेवर करण्यात आल्याचे समजते.
मालीच्या या भागात इस्लामी दहशतवादी गटांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे फ्रान्सच्या हवाई दलाने मिराज फायटर जेट आणि ड्रोन्सच्या मदतीने हा हल्ला केला अशी माहिती फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी सोमवारी दिली.
या ठिकाणी असणाऱ्या तीन देशांच्या सीमेवर अल-कायदा या दहशतवादी गटांतील दहशतवाद्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. या देशांच्या सीमेत येण्याजाण्यासाठी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर मोटार सायकलचा वापर केला जातो. त्यावर फ्रान्सने ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवली होती. त्यानंतर मिराज फायटर जेटच्या सहाय्याने या दहशतवाद्यांवर हल्ला करण्यात आल्याचे फ्लोरेंस पार्ले यांनी सांगितले.
फ्रान्सच्या लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, या कारवाईदरम्यान चार दहशतवाद्यांना पकडण्यात आले आहे. तसेच या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात विस्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. हे दहशतवादी कोणत्यातरी मोठ्या हल्ल्याची तयारी करत होते अशी माहिती फ्रान्सच्या जिहादी विरोधी पथकाला मिळाली होती. या दरम्यान 30 मोटार सायकली नष्ट करण्यात आल्याचेही प्रवक्त्यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात घडलेल्या दोन दहशतवादी घटनांनी फ्रान्स हादरुन गेले होते. मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्राच्या प्रकरणावरुन फ्रान्समध्ये 16 ऑक्टोबर रोजी मिडल स्कूलच्या शिक्षकाला रशियातील चेचन्या वंशाच्या एका 18 वर्षीय मुस्लिम युवकाने ठार मारले होते. त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी पुन्हा अशाच प्रकारच्य़ा एका हल्ल्यात ट्युनिशियाच्या 21 वर्षीय युवकाने नीस शहरातील एका चर्चच्या बाहेर तीन लोकांची हत्या केली होती. त्यानंतर तीन दिवसांनंतर ल्योन शहरातील एका चर्चच्या बाहेर झालेल्या एका गोळीबारात ग्रीक ऑर्थोडॉक्स पुजारी गंभीर जखमी झाला होता. व्हिएन्नामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही फ्रान्समध्ये झालेल्या हल्ल्याचा संदर्भ असल्याचे सांगण्यात येत आहे.
मालीमध्ये युनोची शांतीसेना
मालीमध्ये युनोची शांतीसेना उपस्थित आहे. त्यामध्ये 13,000 सैनिकांचा समावेश आहे. युनोने त्यांच्या या मिशनला MINUSMA असे नाव दिले आहे. त्याचवेळी फ्रान्सने साहेल भागात त्यांचे 5000 सैन्य ठेवले आहे. माली हा देश मोठ्या प्रमाणावर दहशतवादाला बळी पडला आहे.
महत्वाच्या बातम्या: