US On Taiwan: चीन आणि तैवानमध्ये तणावाची स्थिती असताना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ( US President Joe Biden) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. तैवानवर हल्ला (Taiwan) झाल्यास अमेरिकन सैन्य (US Army) त्यांचे संरक्षण करेल अशी स्पष्ट भूमिका व्यक्त करत बायडन यांनी चीनला इशारा दिला आहे. एका मुलाखतीत बायडन यांनी तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकासोबत असल्याचे स्पष्ट केले. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना मुलाखतीत तैवानबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकन सैन्य प्रयत्न करणार का, असे विचारले असता त्यांनी होय असे उत्तर दिले. तैवानवर अभूतपूर्व हल्ला झाल्यास अमेरिका त्यांचे संरक्षण करेल असे बायडन यांनी म्हटले. 


तैवानबाबत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अलिकडच्या काळात घेतलेली ही स्पष्ट भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. तैवानच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका अमेरिकेची आहे. मात्र, बायडन यांनी त्यावर आता अधिकच स्पष्ट भूमिका घेतली आहे. यामध्ये आता, अमेरिकन सैन्य तैवानच्या भूमीवर उतरू शकतात, यावर भूमिका घेतली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनीदेखील अमेरिकेचे तैवानबाबत असलेल्या धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले. 


बायडन सध्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराच्या सोहळ्यासाठी ब्रिटनमध्ये आहेत. बायडन यांनी मागील आठवड्यात 'सीबीएस'ला मुलाखत दिली होती. जवळपास 60 मिनिटांच्या मुलाखतीत बायडन यांनी तैवानचे स्वातंत्र्य, 'वन चायना पॉलिसी' या बाबत कोणतेही भाष्य केले नाही. 


दरम्यान, चीन आणि तैवान दरम्यानचा तणाव वाढत आहे. तैवान हा आमचाच भाग असल्याचा दावा चीनकडून सातत्याने केला जातो. चीनकडून 'वन चायना' धोरणाचा अवलंब केला जातो. यानुसार तैवान, हाँगकाँग आणि मकाऊवर चीन आपला अधिकार व्यक्त करतो. चीनसोबतच्या परराष्ट्र, व्यापार संबंध जोडताना दुसऱ्या देशांनाही 'वन चायना' धोरणाला पाठिंबा द्यावा लागतो. 


नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याने तणाव 


अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी ऑगस्ट महिन्यात तैवानचा दौरा केला होता. या दौऱ्याला चीनने विरोध केला होता. त्यांच्या दौऱ्यावर नाराज असलेल्या चीनने आपली विमाने तैवानच्या हद्दीत घुसवली होती.  21 चिनी लष्करी विमानांनी एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (एडीआयझेड) मध्ये प्रवेश केला. चीनने आपले KJ500 AWACS विमान आणि JF16, JF11, Y9 EW आणि Y8 ELINT विमान तैनात केले होते. चीनचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि हितसंबंध कमी करण्यासाठी अमेरिका जबाबदार असेल आणि याची किंमत अमेरिकेला मोजावी लागेल, असा इशाराही चीनने दिला होता.