न्यूयॉर्क : अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने कोरोना महामारीत नोकरी गमावलेल्या एच-1 बी व्हिसा धारकांना मोठा दिलासा दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने एच- 1 बी व्हिसा संबंधीचे नियम शिथिल केले आहेत. कोरोना काळात अमेरिकेत एच-1 बी व्हिसा धारकांच्या प्रवेशावर निर्बंध लावण्यात आले होते. याचा फटका अमेरिकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या भारतीयांनाही बसला होता.


अमेरिकेच्या प्रशासनाने सांगितले की, अवलंबून असणाऱ्या जोडीदार आणि मुले यांनाही प्राथमिक व्हिसाधारकांसह अमेरिकेत येण्यास परवानगी दिली जाणार आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन आधी एखाद्या व्यक्ती ज्या ठिकाणी नोकरी करत होता, त्याच ठिकाणी नोकरीसाठी एच 1 बी व्हिसा असलेल्यांना यायचं असल्यास, त्यांना अमेरिकेत येण्याची परवानगी दिली जाणार आहे.


याशिवाय टेक्निकल स्पेशालिस्ट, सिनिअर लेव्हन मॅनेजर आणि इतर कर्मचारी यांनाही एच 1 बी व्हिसाद्वारे अमेरिकेत प्रवेश मिळणार आहे. कोरोना काळात ढासळलेली अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारण्यास यामुळे मदत मिळू शकते. ही बाब लक्षात घेत ट्रम्प प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासह आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत, संशोधक म्हणून ज्यांची अमेरिकेत येण्याची इच्छा आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोना संकटात आरोग्य व्यवस्थेस बळ मिळावं यासाठी आरोग्य क्षेत्राशी संबंधित काम करणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश दिला जाणार आहे.


जगभर कोरोना महामारीचा प्रभाव वाढल्याने 22 मार्च 2020 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच 1 बी व्हिसा निलंबित करण्याची घोषणा केली होती. ट्रम्प सरकारच्या या निर्णयामुळे अमेरिकेत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता.