नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार झाल्याची घोषणा केली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी टोल फ्री खुली करण्यास मंजुरी दिल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. याशिवाय अमेरिकन नौदलानं केलेली नाकाबंदी देखील हटवण्याचे अधिकृत आदेश जारी केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. मात्र, इराणकडून या डीलबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दुसरीकडे पाकिस्तानने देखील अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराला दुजोरा दिला आहे. इराणनं अद्याप अधिकृत भूमिका जाहीर न केल्यानं शांतता कराराबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
इराणच्या भूमिकेनं प्रश्नचिन्ह
इराणची वृत्तसंस्था फार्स यांच्याकडून लवकरच सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून अमेरिकेसोबतच्या शस्त्रसंधी कराराबाबत अधिकृत निवेदन जारी केलं जाईल, असं म्हटलं. इराणकडून अद्याप या प्रकरणाबाबत अधिकृत निवेदन जाहीर करण्यात न आल्यानं ट्रम्प यांच्या शांतता कराराला इराणची मंजुरी आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
ट्रम्प यांच्याकडून शांतता कराराची घोषणा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या मीडिया प्लॅटफॉर्मवरुन अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराची घोषणा केली आहे. ट्रम्प म्हणाले की इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसोबत डील पूर्ण झाली आहे. सर्वांचं अभिनंदन. मी या माध्यमातून घोषणा करतो की होर्मुझची सामुद्रधुनी देखील टोल फ्री सुरु होईल आणि अमेरिकन नौदलाला देखील नाकाबंदी हटवण्यास मंजुरी देतोय, असं ट्रम्प म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधनाचा पुरवठा ज्या देशांना होतो त्या जगभरातील जहाजांनी त्यांची इंजिन सुरु करावी आणि तेलाचा पुरवठा सुरु होऊद्यात असं ट्रम्प म्हणाले.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांनी देखील एक्सवर पोस्ट करत अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराला दुजोरा दिला आहे. शहबाझ शरीफ यांनी अमेरिका आणि इराण यांच्या शांतता करार झाला आहे. दोनही पक्षांनी सर्व मुद्यांवर, याशिवाय लेबनॉनमधील लष्करी कारवाई थांबवण्यावर सहबती दर्शवली. पश्चिम आशियातील संघर्षावर मार्ग काढण्याच्या अमेरिका आणि इराण यांच्यातील कटिबद्धतेसाठी सहकार्य करणाऱ्या इतर देशांचे आभार, असंही शहबाझ शरीफ म्हणाले.
शहबाझ शरीफ यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारासाठी सहकार्य करणाऱ्या कतार, सौदी अरेबिया आणि तुर्कीयेचे आभार मानले. अमेरिका आणि इराण यांचे शिष्टमंडळ 19 जनला स्वित्झरलँडमध्ये भेटेल आणि तिथं करारावर स्वाक्षरी होईल,असंही शहबाझ शरीफ यांनी जाहीर केलं.
दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्याकडून इराणवर 28 फेब्रुवारीला हल्ले सुरु करण्यात आले होते. त्याला इराणकडून कडवं प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.
