वॉशिंग्टन : लॉटरी पद्धतीने एच1-बी व्हिसा देताना अतिरिक्त व्हिसा घेतल्याचा ठपका अमेरिकेनं ठेवला आहे. याबाबत टीसीएस, इन्फोसिस, कॉग्निझन्ट आदी कंपनींच्या कृतीवर अमेरिकेनं नाराजी व्यक्त केली आहे.
व्हिसासाठी केलेल्या अर्जांमध्ये टीसीएस, इन्फोसिस, कॉग्निझन्टवर कंपन्यांनी त्यांच्याकडील जागा भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज मागवल्याचा आरोप व्हाइट हाऊसने केला आहे. यामुळे लॉटरी पद्धतीत या दोन्ही कंपन्यांसाठीच अधिक उमेदवार निवडले जाण्याची शक्यता वाढल्याचेही व्हाइट हाऊसने आपल्या आरोपात म्हटले आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, टीसीएस, इन्फोसिस, कॉग्निझन्ट यांसारख्या कंपन्या त्यांच्या गरजेपेक्षा कितीतरी अधिक अर्ज एच 1-बी व्हिसासाठी करवून घेतात, जेणेकरुन लॉटरी पद्धतीत त्यांचेच सर्वाधिक अर्ज मंजूर होतील. या तिन्ही कंपन्यांतून एच 1-बी व्हिसाधारकांना सरासरी वार्षिक वेतन ६० हजार ते ६५ हजार डॉलर दिले जात आहे.
त्याचवेळी सिलिकॉन व्हॅलीतील इंजीनियरचे सरासरी वेतन दीड लाख डॉलर आहे. अशा प्रकारे स्वस्तात मनुष्यबळ रुजू करून घेतले जात असून हे मनुष्यबळ कुशल नसल्याचा आरोपही या अधिकाऱ्याने केला आहे.
दरम्यान, यावर बोलण्यास या तिन्ही कंपन्यांनी नकार दिला आहे.