वॉशिग्टन: नुकत्याच झालेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. पराभूत उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव अमान्य करुन पद सोडण्यास नकार दिला होता. तसेच निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचं सांगून त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.


अमेरिकन निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीन आठवडे झाले तरी ट्रम्प आपल्या निश्चयावर ठाम होते. यादरम्यान त्यांनी जो बायडन यांच्यावर अनेकवेळा टीका केली. आता सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु झाली असल्याने त्याला डोनाल्ड ट्रम्प मंजुरी देतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


जो बायडन यांना आमंत्रण
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनरल सर्व्हिस ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनला सत्ता हस्तांतरण प्रक्रिया सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की प्रक्रियानुसार जे काही करणे आवश्यक आहे ते केले पाहिजे. त्यानंतर जनरल सर्व्हिस ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमुखांनी जो बायडन यांना पत्र लिहून त्यांना सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये सामिल होण्याचे आमंत्रण दिले आहे. विश्लेषकांच्या मते, सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेला मान्यता देऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे आपला पराभव मान्य करण्याचे संकेत दिले आहेत.


डोनाल्ड ट्रम्प यांनी अजूनही त्यांचा पराभव मान्य केला नाही. या दरम्यान त्यांनी जे काही शक्य आहे ते सर्व करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली, अधिकाऱ्यांवर अनेक प्रकारे दबाब आणण्याचा प्रयत्न केला. निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, "जे नियमानुसार आहे ते केले पाहिजे, परंतु याचा अर्थ असा नाही की जो बायडन यांचा विजय आम्ही मान्य केलाय. मी त्यांचे अभिनंदनही करणार नाही कारण निवडणुकीतील या निकालाला आम्ही न्यायालयात आव्हान दिले आहे."


या सत्ता हस्तांतरणांमुळे आता निर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या टीमला व्हाईट हाऊसमधील अनेक महत्वाच्या गोष्टींचा अधिकार प्राप्त होणार आहे. निर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी या अगोदरच संरक्षणासंबंधीच्या नियमित बैठकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आहे.


महत्वाच्या बातम्या: