US attacks on Iran : इराण आणि इस्रायलमधील (Iran Vs Israel War) सुरू असलेल्या संघर्षात आता अमेरिकेने (America) थेट सहभाग घेतला आहे. रविवारी पहाटे अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणमधील (Iran) तीन महत्त्वाच्या अणुकेंद्रांवर जोरदार हल्ला केला, ज्यामुळे मध्यपूर्वेत मोठ्या युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ट्विट करून इराणवरील हल्ल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या विमानांनी फोर्डो, नातांझ आणि एसफहान या तीन प्रमुख आण्विक ठिकाणांना लक्ष्य करत यशस्वी हल्ले केले. विशेषतः फोर्डो येथील आण्विक केंद्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. आमची विमानं हल्ला करुन सुरक्षितपणे माघारी परतली आहेत. आता शांततेची वेळ आहे, इराणनं युद्ध थांबवावं, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे.

इराणचा अमेरिकेला इशारा

आता उत्तर देण्याची आमची वेळ आहे, अशा इशारा इराणच्या वृत्तपत्रातून देण्यात आला आहे. आधी बहारीनमधल्या अमेरिकेच्या नौदल तळावर हल्ला करा. बहारीनवर हल्ला केल्यास अमेरिकेची जहाजे फिरकणार नाहीत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मन यांच्या जहाजांना जागा मिळणार नाही, असे या वृत्तपत्रात म्हणण्यात आले आहे. तसेच 'युद्ध तुम्ही सुरू केले त्याचा शेवट आम्ही करू. अमेरिकेला आता अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल. अमेरिकेचं कधी झालं नाही, असं नुकसान होईल, असा थेट इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी अमेरिकेला दिला आहे. त्यामुळे इराणनेही आता जशास तसा उत्तर देण्याचा पवित्र घेतल्याचे दिसून येत आहे. 

अयातुल्ला खामेनी यांनी निवडले तीन उत्तराधिकारी

दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इस्रायलकडून संभाव्य हत्येचा धोका लक्षात घेता, खामेनी यांनी आपल्या तीन उत्तराधिकाऱ्यांची निवड केली असल्याची माहिती समोर आली आहे. अलीरेजा अराफी, अली असगर हेजाजी आणि हासिम हुसैनी बुशहरी, अशी त्यांची नावे असल्याचे समजते. यामध्ये खामेनी यांचे पुत्र मुजतबा खामेनी यांचे नाव नाही, हे विशेष लक्षवेधी आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे खामेनी यांची तीन दशकांपासूनची सत्ता धोक्यात आल्याचे मानले जात आहे. तसेच, सध्या खामेनी एका अत्यंत सुरक्षित बंकरमध्ये लपल्याची माहितीही समोर आली आहे.

आणखी वाचा

US attacks on Iran: तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात झालीय का? अमेरिकेच्या इराणवरील घातक बॉम्ब हल्ल्यानंतर चर्चांना उधाण