लंडन : युनायटेड किंग्डममध्ये एक अनोखी आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. आईच्या गर्भात असतानाच एका अर्भकाच्या पाठीच्या कण्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. बेथन सिम्पसन असं या 26 वर्षीय महिलेचं नाव असून ती 24 आठवड्यांची गर्भवती आहे.

एसेक्सची रहिवासी असलेल्या बेथन सिम्पसनला डॉक्टरांनी 20 आठवड्यांच्या स्कॅननंतर सांगितलं होतं की, तिच्या गर्भात वाढत असलेल्या मुलीला 'स्पायना बिफिडा' नावाचा आजार आहे. हा एक प्रकारचा जन्मदोष आहे, ज्यात बाळाच्या स्पायनल कॉर्डची योगरित्या वाढ होत नाही.

Spina Bifida काय आहे?
स्पायना बिफिडा हा एक असा जन्मदोष आहे, ज्यात गर्भातील बाळाचा स्पाईन आणि स्पायनल कॉर्डची वाढ होत नाही. यामुळे स्पाईनच्या हाडामध्ये गॅप राहतो. डॉक्टरांच्या मते, या जन्मदोषामागील ठोस कारणांचा शोध लागलेला नाही. पण गर्भारपणाच्या सुरुवातीला फॉलिक अॅसिडची कमतरता अशाप्रकारच्या दोषांचं कारण ठरु शकते. याशिवाय गर्भावती असताना अनेक औषधांचं सेवन आणि कुटुंबातील इतर कोणाला स्पायना बिफिडा हा जन्मदोष असला तर तो बाळातही येऊ शकतो.

युकेमध्ये बेथन सिम्पसन अशी चौथी महिला आहे, जिच्यावर 'फीटल रिपेअर' (foetal repair) शस्त्रक्रिया करण्यात आली. चार तास सुरु असलेल्या ऑपरेशनमध्ये सिम्पसनचा गर्भ उघडण्यात आला. यानंतर बाळाची जागा बदलण्यात आली, जेणेकरुन होल गॅप शिवून भरला आणि पाठीचा कणा योग्य स्थितीत ठेवला.

अशाप्रकारे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून एप्रिलमध्ये बेथन सिम्पसनची प्रसुती होणार आहे.

खरंतर गुंतागुंत पाहून डॉक्टरांनी बेथन सिम्पसनला गर्भपाताचा सल्ला दिला होता. कारण फीटल रिपेअर शस्त्रक्रिया जोखमीची ठरु शकते. परंतु तिला हे मान्य नव्हतं. ती म्हणाली की, "मला गर्भातील बाळाच्या हालचाली जाणवत होत्या, त्यामुळे मी हा विचारही करु शकत नाही. गर्भपात करुन मी योग्य केलं नसतं."

"दुपारी एक वाजता माझ्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि संध्याकाळी मला बाळाच्या हालचाली जाणवत होत्या. गुंगीतून बाहेर आल्यावर मला तिच्या लाथा जाणावल्या. ती आता मोठी झाली असून त्याच्या लाथाही मजबूत आहेत," असं बेथन सिम्पसनने सांगितलं.