न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सात दिवसीय अमेरिका दौरा संपवून भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. याआधी नरेंद्र मोदींनी संपूर्ण जगाला दहशतवादाविरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या 74 व्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी नाव न घेता भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला असं नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला सुनावलं.
दहशतवाद आज मानवजातीसमोरील आणि जगासमोरील मोठं आव्हान आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण जगाने दहशतवादाविरोधात उभं राहण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केलं. यावेळी मोदींनी भारताचा इतिहास, परंपरा, सरकारने केलेली विकास कामं, पर्यावरण यावर बोलणं पसंत केलं.
नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानचं नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला. भारत जगभरात नेहमीच एकजुटीचा आणि शांतीचा संदेश देत आला आहे. यावेळी मोदींनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि कवी कणियन पूंगुन्ड्रनार यांच्या विचारांचा उल्लेख आवर्जुन केला. मोदींनी आपल्या भाषणात ग्लोबल वॉर्मिंग, सिंगल युज प्लास्टिक आणि टीबीचाही उल्लेख केला.
संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन मोदींनी भारत सरकारच्या विविध योजनांचीही माहिती दिली. यामध्ये जलसंधारण, हेल्थ इन्शुरन्स, शौचालय इत्यादींसाठीच्या भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती मोदींनी दिली. भारताने जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम राबवून 11 कोटी शौचालये बांधली. 15 कोटी घरांमध्ये पाणी पुरवठा दिला. तर 2025 पर्यंत भारताला टीबी मुक्त करण्यासाठी काम करत असल्याचेही मोदींनी सांगितले, अशी माहिती मोदींनी दिली.
इम्रान खान यांनी अणू युद्धाचा राग आळवला
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रात भाषण करतान अणू युद्धाचा राग आळवला. तसेच भाषणासाठी त्यांना फक्त 15 मिनिटांचा वेळ असताना त्यांनी तब्बल 50 मिनिट भाषण केलं. त्यामुळे त्यांच्यावर दबक्या आवाजात टीका होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र बरोबर 16 मिनिटात आपलं भाषण संपवलं. इम्रान खान यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश अण्वस्त्र संपन्न आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास त्याचे परिणाम सीमेपलिकडे असतील. दोन्ही देशांमध्ये युद्ध झाल्यास काहीही होऊ शकतं, असं इम्रान खान यांनी म्हटलं.