Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला सहा महिने पूर्ण झाले असून युद्ध अद्यापही सुरुच आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशियाने युक्रेनवर हवाई हल्ला केला. याचा बदला घेत युक्रेनने थेट रशियन मुख्यालयावर (Russian Headquarters) हल्ला केला आहे. युक्रेननं रशियाच्या मुख्यालयावर हल्ला करून रशियाच्या 200 पॅराट्रूप्सना ठार केलं आहे. युक्रेनच्या प्रादेशिक गव्हर्नर (Russian Headquarters) यांनी याबाबत माहिती दिली आहे. युक्रेनच्या पूर्वेतील रशियन तळ पाडण्यासाठी हा हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. युक्रेनच्या या हल्ल्यात रशियाचे 200 पॅराट्रुपर्स (Russian Airborne Troops) मारले गेले आहेत.
हल्ल्याचे फोटो केले शेअर
युक्रेनमधील लुहान्स्क प्रांताचे प्रशासकीय गव्हर्नर सेर्ही हैदाई यांनी शुक्रवारी टेलिग्राम पोस्टद्वारे या हल्ल्यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, युक्रेनच्या सैन्याने कदिव्का शहरातील एका हॉटेलमधील रशियन तळावर यशस्वी हल्ला केला. सध्या युक्रेनच्या पूर्वेकडील भागात रशियाच्या युद्धाचा वेग आता काहिसा मंदावला आहे. गव्हर्नर हैदाई यांनी पोस्टमध्ये इमारतीचा फोटो देखील शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये युद्धग्रस्त इमारतीच्या फोटोंचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की रशियन सैन्य 2014 पासून या इमारतीचा तळ म्हणून वापर करत आहे.
युक्रेनच्या पूर्व डोनबास भागात युद्ध तीव्र
युक्रेनची राजधानी कीव्ह ताब्यात घेण्यात अयशस्वी झाल्यानंतर रशियन सैन्यानं आता युक्रेनच्या पूर्व डोनबास प्रदेशात युद्ध तीव्र केलं आहे. हैदाई यांनी जूनमध्ये सांगितलं होतं की युक्रेनियन सैन्यानं रशियानं वापरलेलं कदिव्का येथील तळ नष्ट केलं होतं.
ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने दिले अपडेट
दरम्यान, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी एका ट्विटमध्ये युक्रेनमधील परिस्थितीचे अपडेट देत सांगितलंय की, डोनबास प्रांतात युद्ध तीव्र करण्याचा रशियाचा विचार आहे. रशियाकडून मोठ्या युक्रेनियन हल्ल्याची शक्यता आहे. सध्या येथे रशियाला युद्धसामग्री, वाहने आणि कर्मचार्यांची कमतरता आहे.