टोकियो : विमानातील हाणामारीचा प्रकार आता फारसा नवीन राहिलेला नाही. टोकियोहून लॉस अँजेलसला जाणाऱ्या विमानातही दोन प्रवाशांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी रंगली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

जपानमध्ये ऑल निप्पोन एअरवेज (ANA) च्या विमानात दोन प्रवाशांमध्ये ही मारामारी झाली. जपानच्या नारिता एअरपोर्टवर टेक ऑफ घेण्याच्या तयारीत असलेल्या विमानात सोमवारी हा प्रकार घडला. कोरी अवर नावाच्या व्हिडिओग्राफरने या घटनेचा व्हिडिओ शूट केला आहे.

मारामारीला सुरुवात करणाऱ्या चाळिशीतील अमेरिकन नागरिकाला टोकियो विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतलं. मारहाण सुरु असताना मध्ये पडलेल्या ऑल निप्पोन एअरवेज (ANA) च्या कर्मचाऱ्याला दुखापत केल्याप्रकरणी प्रवाशावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

व्हिडिओत लाल रंगाचा फुलांचा शर्ट परिधान केलेली व्यक्ती सहप्रवाशाला ठोसे लगावताना दिसत आहे. दोघांचं भांडण सोडवण्यासाठी एअर हॉस्टेस मध्ये पडली असता, तिलाही ठोश्यांचा 'प्रसाद' मिळाला. कोणालाच हा वाद कसा सुरु झाला, याची कल्पना नाही.

पाहा व्हिडिओ :

https://twitter.com/ABC/status/859452464436727808