इस्लामाबाद : अमेरिकेने पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतावर ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या एहसान उर्फ खवैरीला कंठस्नान घालण्यात आलं.
अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील हांगु जिल्ह्यात ड्रोनद्वारे हल्ला केला. उत्तर वझिरीस्तानातील या हल्ल्यात हक्कानी संघटनेचा म्होरक्या एहसानसह आणखी दोघांना ठार मारण्यात आलं. अफगाण शरणार्थींशी संबंधित एका घराला टार्गेट करुन हा हल्ला करण्यात आला होता.
वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. दहशतवादविरोधी कारवाई कडक करण्यास अमेरिकेने पाकला बजावलं होतं. मात्र कुठलीही कारवाई न केल्यामुळे वॉशिंग्टनहून पाकिस्तानला होणारी लष्करी आणि आर्थिक मदत रोखली होती.
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका हॉटेलवर रविवारी तालिबानी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने कडक पावलं उचलली. पाकिस्तानच्या क्षेत्रात लपलेल्या तालिबानी दहशतवाद्यांना अटक करा किंवा देशातून बाहेर काढा, अशी चेतावनी अमेरिकेने दिली होती.