बिष्केक (किर्गिझस्तान) : हाँगकाँगहून निघालेलं तुर्किश कार्गो विमान किर्गिझस्तानमधील घरांवर कोसळून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बहुसंख्य नागरिक हे विमानातील नसून इमारतीतील रहिवासी असल्याची माहिती आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.30 वाजता ही दुर्घटना घडली.

किर्गिझस्तान देशातील मानस विमानतळाजवळ बोइंग 747 विमान क्रॅश झालं. तुर्कीतील इस्तानबुलच्या दिशेने मार्गक्रमण करण्याआधी मानस विमानतळावर हे कार्गो विमान लँड होणार होतं. मात्र त्यापूर्वीच ते क्रॅश झालं. राजधानी बिष्केकपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली.

दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली होती, यामुळे अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र क्रॅशिंगचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 'माय कार्गो' या तुर्कीतील एअरलाईनचं विमान असल्याची माहिती किर्गिझ सरकारने दिली आहे.

अपघातात किमान 15 इमारतींचं नुकसान झालं असून हा भाग हॉलिडे होम्ससाठी प्रसिद्ध आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याची माहिती आहे.