Turkey Earthquake Bird Viral Video : पशू-पक्षांना संकटाची चाहूल लागते असं आपण अनेक वेळा वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलं असेल. सध्या तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीने जगाचं लक्ष वेधलं आहे. तुर्की आणि सीरियात भूकंपामुळे सुमारे 4000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या भूकंपाआधीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पक्षी आकाशात घिरट्या घालत विचित्र आवाज काढताना ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


पशू-पक्षांना आधीच लागते संकटाची चाहूल?


एखादं संकट येण्यापूर्वी पक्षी किंवा प्राण्यांना त्याची चाहूल लागते, असं म्हटलं जातं. अनेक वेळी तुम्ही ऐकलं असेल की, कुत्र्यांनी काही संकटाची चाहूल लागली की ते रडतात. काही वाईट घडणार आहे याचा अंदाज आल्याने काही पशू आणि पक्षी विचित्र आवाज किंवा हालचाल करून आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात, असं काही लोक मानतात. त्यामुळे तुर्कीमधील हा व्हिडीओ पाहिल्यानंतरही लोक आता हेच म्हणत आहेत. सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे की, भूकंपाची चाहूल लागल्यामुळे तुर्कीमध्ये पक्षी विचित्र आवाज काढत आकाशात घिरट्या घालत होते.  


व्हायरल व्हिडीओ :






भूकंपाआधी तुर्कीमध्ये पक्षांचा विचित्र आवाज


व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, काही पक्षी आवाज घिरट्या घालत विचित्र प्रकारचा आवाज काढत आहे. हा आवाज अतिशय कर्कश आणि मोठा आहे. या परिसरातील लोकांनी पक्षांचे हे कधी न पाहिलेलं वागणं आणि हालचाली विचित्र असल्याचे जाणवले आणि काहींनी ही घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रित केली. त्यानंतर सोमवारी तुर्की आणि सीरियामध्ये भूकंप झाला. त्यामुळे आता पक्षांच्या या विचित्र वागण्याचा संदर्भ भूकंपाच्या घटनेसोबत जोडला जात आहे.


पक्षी तज्ज्ञांचं मत काय?


प्राण्यांना किंवा पक्षांना संकटाची चाहूल लागते की नाही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बाब समोर आलेली नाही. दरम्यान, पक्षीतज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात संवद साधताना सांगितले होते की, पक्षी धोका दिसल्यावर वेगळ्या प्रकारचा आवाज काढतात आणि आपल्या साथीदारांना अलर्ट करतात. साधारणपणे पक्षी ज्या आवाजात किलबिलाट करतात, त्या उलट धोक्याची चाहूल लागल्यावर त्यांचा आवाज हा मोठा असतो. 


आनंद महिंद्रा यांचं ट्विट






आनंद महिंद्रांनी व्हिडीओ केला ट्विट


सोशल मीडियावर सक्रिय असलेले उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये याला Nature's Alarm म्हटलं आहे. महिंद्रा यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, 'निसर्गाची अलार्म सिस्टम. जे ऐकण्यासाठी आपण अद्याप निसर्गाशी पूर्णपणे जोडले गेलो नाही.'


तुर्की-सीरियामध्ये भूकंपामुळे 4000 जणांचा मृत्यू


तुर्की आणि सीरियामध्ये मोठी नैसर्गिक आपत्ती आली आहे. तुर्कीमध्ये सोमवारी पहाटे 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतरही तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे 40 हून अधिक धक्के बसले. यामुळे, तेथील हजारो घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकून सुमारे 4000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मात्र हवामान बदलामुळे यामध्ये अडथळे येत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Turkey Earthquake : हेकेखोर पाकिस्तान... तुर्कीसाठी मदत घेऊन जाणाऱ्या भारतीय विमानांना हवाई हद्दीत प्रवेश नाकारला