अंकारा (तुर्की) : बलवत्तर नशीब म्हणजे नेमकं काय, याची प्रचिती तुर्कस्तानातील एका नागरिकाला आली. कारण एक दोन नव्हे तर तब्बल 62 टन वजनाचे दोन रणगाडे अंगावरुन जाऊनही, जीव वाचला आहे. साबरी उनाल असं या मृत्युवर मात करणाऱ्या तुर्की नागरिकाचं नाव आहे.

 

काय आहे प्रकरण?

गेल्या शुक्रवारी रात्री तुर्कस्थानमध्ये लष्करानं सरकारविरोधात बंड पुकारुन सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला. तुर्कीतल्या अंकारा शहरावर लष्कराच्या एका गटानं अचानकपणे हेलिकॉप्टर, रणगाड्यांद्वारे हल्ले करुन संसदेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुर्कीच्या रस्त्यावर लष्कराची दहशत पाहायला मिळत होती.

 

याचवेळी तुर्की नागरिकांनी रस्त्यावर उतरुन लष्कराचं हे बंड मोडून काढा, असं आवाहन राष्ट्राध्यक्षांनी केलं होतं. त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला.



लष्कराला रोखण्यासाठी साबरी उनाल रस्त्यावर

साबरी उनाल यांनीही रस्त्यावर उतरुन लष्कराला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या रणगाड्यांना रोखण्यासाठी, उनाल यांनी थेट त्यांच्या आडवे जाऊन हात उंचावून थांबण्याचं आवाहन केलं. मात्र सुसाट असलेल्या रणगाड्याने त्यांची दखल न घेता पुढे चाल केली. त्याचवेळी साबरी उनाल रस्त्यावर झोपले, त्यामुळे रणगाडा त्यांच्या वरुन गेला.

 

रणगाड्याच्या ट्रॅकच्या मध्ये आल्याने उनाल यांना दुखापत झाली नाही. रणगाडा तसाच पुढे गेला आणि उनाल पुन्हा उभे राहिले. पुन्हा हाच प्रकार घडला.

 

दुसऱ्या टँकलाही रोखण्यासाठी त्यांनी तीच पुनरावृत्ती केली. सुदैवाने यावेळीही त्यांचा जीव वाचला. मात्र  या सगळ्या प्रकारात त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.

VIDEO: