वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ही पहिलीच भेट होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली.


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपल्याकडे मदत मागितली आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. काश्मीर मुद्द्यावर दोन्ही देशात मध्यस्थी करण्याचा मला आनंद होईल, असंही ट्रम्प यांनी म्हटलं. मात्र काश्मीरच्या मुद्द्यावर भारत-पाकिस्तान वगळता इतर कोणीही हस्तक्षेप करु नये, अशी भारताची भूमिका आहे.





"काश्मीरच्या मुद्द्यावर मी मदत करु शकतो. यामध्ये मध्यस्थी करणे मला आवडेल", असं ट्रम्प यांनी म्हटलं. इम्रान खान यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेचं स्वागत केलं. अमेरिका तयार असेल तर कोट्यवधी लोकांची प्रार्थना त्यांच्यासोबत आहे.





ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर द्विवपक्षीय चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्नी ट्रम्प यांच्याकडे कोणतीही मदत मागितली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली.


मात्र डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान यांच्या भेटीनंतर व्हाईट हाऊसने जारी केलेल्या प्रेल रिलीजमध्ये काश्मीर मुद्द्याचं उल्लेखही नव्हता. इम्रान खान यांच्यासोबत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जावेद बाजवा, आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद आणि परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी व्हाईट हाऊसमध्ये गेले होते.